जागेचा मोबदला मराठी शाहीर परिषद कोकण विभागास अदा कऱण्याचे प्रातांधिकाऱ्यांचे आदेश
मंडणगड l प्रतिनिधी : मंडणगड शहरा लगत असणाऱ्या कला भवन ची जागा नव्याने निर्मीती होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गात अधिगृहण करण्यात येत असुन त्या जागेचा मोबदला हरिश्चंद्र कृष्णा लोखंडे मराठी शाहीर परिषद कोकण विभाग यांना अदा करण्याचे बाबतचे आदेश दापोली प्रातांधिकारी यांनी 10 ऑक्टोंबर 2023 रोजी या संदर्भात करण्यात आलेल्या दाव्या संदर्भात निर्गमीत केलेल्या आदेशात नुमद केले आहे. याबाबत श्री. लोखंडे यांनी पत्रकारांना दिलेल्या माहीतीनुसार अरविंद जाधव यांनी भुसंपादन मोबदला अखिल भारतीय मराठी शाहिर परिषद शाखा मंडणगड यांना मिळावा याकरिता प्रातांधिकारी दापोली यांच्याकडे अपील क्रमांक 10/2023 अन्वये अपील दाखल केले होते. या अपीलाची 11 ऑगस्ट 2023 रोजी दापोली येथे सुनावणी घेण्यात आली. यावेळी दोन्ही संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. या सुनावणीमध्ये श्री. लोखंडे यांनी हक्क सिध्द करण्यासाठी लागणारे सातबार, खरेदीखत, संस्था रजिस्टर, पी.टी.आर. उतारा सादर करुन आपली बाजू मांडली. त्या संदर्भातील निर्णयाचे आदेश पारित झाल्याचे श्री. लोखंडे यांना प्रांत कार्यालय दापोली यांच्याकडून पाठविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंडणगड तालुक्यातील अबालवृध्द कलाकारांनी अथक परिश्रमातून निर्माण केलेल्या कला भवनाला काबीज करण्याचा प्रयत्न योग्य न्यायीक निर्णयामुळे असफल झालेला असल्याची प्रतिक्रीया श्री. लोखंडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच या निमीत्ताने अस्तित्व नसलेल्या संस्था व स्वंयघोषीत शाहीरांपासून कोकणातील कलाकारांनी सावध रहावे असे आवाहनही केले आहे.










