उत्तम आरोग्य, स्वच्छतेमुळे राहाल सुरक्षित- डॉ. तोरल शिंदे

रोटरी क्लबतर्फे महर्षी स्त्री शिक्षण संस्थेत आरोग्य तपासणी शिबिर

रत्नागिरी : उत्तम आरोग्य आणि स्वच्छता सर्वांत महत्त्वाची आहे, म्हणजे तुम्ही ८० टक्के सुरक्षित राहाल. जंक फूड खाऊ नका. मुलगी म्हणजे उद्याची जननी आहे. त्यामुळे पिढी घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही पुढची पिढी संस्कारक्षम घडवली पाहिजे, असे प्रतिपादन स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे यांनी केले.

महर्षी कर्वे शिक्षण संस्थेत फक्त मुलींना शिक्षण दिले जाते, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर, अभियंता, खगोलशास्त्रज्ञ, संगणतज्ज्ञ व्हायला पाहिजे. रोटरी क्लबने आरोग्य शिबिरासाठी खूप मेहनत घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील बीसीए कॉलेजमध्ये विद्यार्थिनींकरिता बुधवारी दि. ११ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. शिंदे बोलत होत्या.

या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र घाग, सचिव रूपेश पेडणेकर, ज्येष्ठ सदस्य धरमसीभाई चौहान, बीसीए कॉलेजच्या प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, महर्षी कर्वे स्त्री संस्थेचे प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत, विनायक हातखंबकर, माधुरी कळंबटे, परेश साळवी, श्रीकांत भुर्के, अशोक घाटे, प्रमोद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी अध्यक्ष राजेंद्र घाग यांनी आरोग्य शिबिराच्या आयोजनाकरिता केलेल्या सहकार्याबद्दल महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे आणि प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई यांचे आभार मानले. महाविद्यालयात रोटरॅक्ट क्लब स्थापन करण्याची सूचना केली.

आरोग्य शिबिरात रक्तगट तपासणी, जनरल तपासणी, नेत्रतपासणी, दंततपासणी यांचे आयोजन केले होते. याकरिता जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय विभाग, पतंजली चिकीत्सालयाच्या डॉ. ममता पटेल, डॉ. रोझा भुर्के, डॉ. सायली पेडणेकर, परकार हॉस्पीटलच्या डॉ. निवेदिता व टीम, इन्फिगो आय केअर हॉस्पीटल, डॉ. हेमल काळे यांचे सहकार्य लाभले. दिवसभरात सुमारे १२० मुलींची तपासणी केली. रोटरी क्लब सदस्य माधुरी कळंबटे यांनी सूत्रसंचालन केले. निमिषा शेट्ये यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब पदाधिकारी, सदस्य कर्वे संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.