दापोली | प्रतिनिधी : आविष्कार २०२३ या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेसाठी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून १६ विद्यार्थ्याची निवड झाली आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या ठिकाणी अविष्कार २०२३ या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शाश्वत विकासासाठी काही कृषी आधारित प्रकल्पावर प्रयोग केले आहेत. त्याकरिता विद्यापीठाकडून युवा संशोधकासाठी दोन दिवसाच्या शिविराचे दि. ९ ते १० जानेवारी २०२३ दरम्यान आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना विषय तज्ञांचे मार्गदर्शन तसेच सराव परीक्षा घेण्यात आले.
या प्रकल्पांचे सादरीकरण विद्यार्थ्यांच्याकडून उत्कृष्ट दर्जाचे व्हावे म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे बिजनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर श्री दिलीप आवटी सर यांचे मार्गदर्शन मुलांना देण्यात आले. त्यामध्ये आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, सराव आणि वेळेचे महत्व इत्यादी विषयावर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. दिलीप आवटी सरांनी नवोदित संशोधक यांना यशाचा मूलमंत्र दिला. त्याचप्रमाणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी विद्यार्थ्यासोबत त्यांच्या प्रकल्पाविषयी चर्चा व मार्गदर्शन केले. विद्यापीठातील माजी विध्यार्थी बाळासाहेब धमे यांनी मुलांना सादरीकरण कसे करावे या बद्दल सविस्तर माहिती दिली. सदरील शिबिराचे आयोजन डॉ. विठ्ठल नाईक, संचालक, क्रीडा व सह शैक्षणिक उपक्रम यांच्या मार्गदर्शनाखाली, आविष्कार समन्वयक डॉ. मनिष कस्तुरे यांनी केले.