Typing Exam: टायपिंगच्या शासकीय परीक्षेचा निकाल जाहीर; कुठे अन् कसा पाहाल निकाल?

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने यंदा जुलैमध्ये झालेल्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र (टंकलेखन) परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे. परीक्षार्थींनी निकालापासून १० दिवसांत गुण पडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती, तसेच पुर्नमुल्यांकनासाठी अर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहायक आयुक्त संगीता घोडेकर यांनी केले आहे.

परीक्षेचा निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकांची ऑनलाइन प्रिंट घेता येणार आहे. विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे, गुणपत्रके डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाइन स्वरूपात संबंधित संस्थांच्या लॉगीनला उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे करून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येतील.

संबंधित विद्यार्थ्यांना सॉफ्टकॉपी पीडीएफ स्वरूपात देण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार छपाई करून घेता येईल. संस्थांनी संबंधित विद्यार्थ्यांस प्रमाणपत्र, गुणपत्रके वितरित केलेली पोहोच दप्तरी जतन करून ठेवावी.

गुणपडताळणीसाठी प्रतिविषय १०० रुपये तर छायाप्रत मिळण्यासाठी प्रतिविषय ४०० रुपये ऑनलाइन पद्धतीने ५ नोव्हेंबरपर्यंत भरावेत. गुणपडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयात पाच दिवसांत पुर्नमुल्यांकनासाठी प्रतिविषय ६०० रुपयांप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने रक्कम भरून अर्ज करावेत, यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. याबाबतच्या सूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिल्या आहेत.