राजापूर (वार्ताहर): येथील भाजपा जिल्हा उपाध्यक्षा व माजी नगरसेविका सौ. शितल सुनिल पटेल यांना त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, शासकीय व निमशासकीय क्षेत्रात निस्वार्थीपणे केलेल्या उल्लेखनिय कार्याच्या सन्मानार्थ नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर बेळगाव यांच्या वतीने ¬¬राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
नुकत्याच बेळगाव रामनगर धर्मनाथ भवन येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळयात मलेशिया फौंडेशन अध्यक्षा सौ. सिमाताई इंग्रोळी यांच्या हस्ते माजी होम जिल्हा कमांडंट अरविंद घट्टी, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या प्रमुख उपस्थीतीत सौ. पटेल यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.
या सोहळयाला माजी खासदार अमरसिंह पाटीलमाजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर, माजी आमदार संपतराव बापु पवार पाटील, माजी महापौर, कोल्हापुर सुहास शिरोडकर, शुभलक्ष्मी विनायकराजी कोरे तसेच सुनील पटेल, चि. जगदीश पटेल उपस्थीत होते.
सौ. पटेल या गेली सतरा ते अठरा वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी माजी नगरसेविका म्हणून काम केले आहे. तसेच महिला पतपेढीच्या उपाध्यक्षपदी त्या कार्यरत आहेत. तसेच महिला दक्षता समितीवरही त्या सदस्य आहेत. या विविध पदांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहत निस्वार्थी सेवा बजावली आहे. त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.












