कोदवली व अर्जुना नदीवर दहा वनराई बंधारे
राजापूर | प्रतिनिधी : यावर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस व राजापूर शहरात दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन यावर्षी पाणीटंचाई काळात नागरिकांना उपलब्ध पाणीसाठयातुन सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी नगर परिषद प्रशासनाने आत्तापासूनच नियोजन हाती घेतल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली.
कोदवली धरणातील पाणीसाठा टीकून रहावा, धरणात जास्तीत जास्त पाणीसाठा व्हावा यासाठी नव्याने बांधण्यात येत असलेल्या धरणाच्या गाळयांमध्ये मातीच्या पिशव्या रचून वनराई बंधार बांधून पाणी अडविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
तर कोदवली धरणातील पाणीसाठयात आणखी वाढ व्हावी यासाठी धरणाच्या वरच्या बाजुलाही दोन बंधारे बाधण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. राजापूर शहरात दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. नवीन धरणाचे काम निधी अभावी रखडले आहे. त्यातच यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्तापासूनच नियोजन हाती घेण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले. कोदवली व अर्जुना नद्यांवर यावर्षही दहा वनराई बंधारे बांधले जाणार आहेत. नगर परिषदेकडूनच हे बंधारे बांधले जाणार आहेत. जेणेकरून कोदवली धरण व शिळ जॅकवेलकडे पाणीसाठा टिकून राहीलच पण नदीपात्रालगत असणाऱ्या खासगी विहिरी व तलावांमध्येही पाणीसाठा होण्यास मदत होईल यासाठी हे नियोजन करण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले.
पाणीपुरवठा अभियंता संजीव जाधव, पाणीपुरठा विभागाचे कर्मचारी प्रदीप आसवेकर, प्रेमनाथ नागवेकर व कर्मचारी यासाठी काम करत आहेत.
उपलब्ध पाणीसाठयातुन नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा न. प. प्रशासनाचा प्रयत्न रहाणार आहे. मात्र यावर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस व पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता नागरिकांनी आत्तापासूनच पाणी जपून वापरावे असे आवाहनी भोसले यांनी केले आहे.











