
सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ आयोजित ‘श्रीकृष्ण महिमा नरकासुर प्रतिमा’ स्पर्धा ठरली लक्षवेधी
स्पर्धेस स्पर्धक व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण | प्रतिनिधी : श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. कृष्ण महिमा तसेच नरक चतुर्दशीचे महत्व युवा पिढीसमोर अधिक स्पष्टपणे यावे या उद्देशाने मालवण मधील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने यावर्षी मालवणात आयोजित श्रीकृष्ण महिमा नरकासुर प्रतिमा ही आगळी वेगळी नरकासुर स्पर्धा लक्षवेधी ठरली. स्पर्धक ग्रुप व प्रेक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्पर्धेस लाभला. भव्यदिव्य नरकासुर प्रतिमा व श्रीकृष्ण महिमा सादरीकरण पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या गर्दीने भरड तारकर्ली नाका रस्ता परिसर गर्दीने भरून गेला. स्पर्धेत लहान गटात देऊळवाडा बॉईज तर खुल्या गटात रेकोबा मित्रमंडळ वायरी विजेते ठरले.
सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या नरकासुर प्रतिमा स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. नरकासुर प्रतिमा व कृष्ण महिमा स्वरूपातील या स्पर्धेत आयोजक सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत
प्लास्टिक मुक्ती, महिला सुरक्षा, व्यसनमुक्ती आदी संदेश माध्यमातून सामाजिक जनजागृती केली.
लहान गटात इको फ्रेंडली नरकासुर प्रतिमा ही अटही होती. यात 20 स्पर्धक मंडळ यांनी सहभाग घेतला. यात देऊळवाडा बॉईज (प्रथम), महापुरुष देऊळवाडा (द्वितीय), कोळंबी बॉईज (तृतीय) क्रमांकाचे मानकरी ठरले. तर खुल्या गटात 14 मंडळ सहभागी झाले यात रेकोबा मित्रमंडळ वायरी (प्रथम), ईस्वटी महापुरुष देऊळवाडा (द्वितीय), महापुरुष रेवतळे (तृतीय) तसेच धुरीवाडा बॉईज, राजकोट बॉईज, दांडी बॉईज यांना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी राकेश सावंत, चंद्रकांत मयेकर, तुषार वाघ, निशय पालेकर, गौरव लुडबे, प्रतीक कुबल, प्रतीक आचरेकर, प्रणव आचरेकर, फ्रासिस फर्नांडिस, बंड्या पराडकर, प्रशांत गवंडी, अथर्व सावजी, तन्मय पराडकर, आदित्य मोर्जे, कुणाल खानोलकर यासह सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ मान्यवर उपस्थित होते. मालवणी समलोचक बदल चौधरी यांच्या सूत्रसंचालनाने स्पर्धेत अधिक रंगत आली.
स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व स्पर्धक मंडळ तसेच उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचे सौरभ ताम्हणकर यांनी आभार मानले. यासह स्पर्धेच्या यशस्वीतेत मालवण नगरपालिका व पोलीस प्रशासनाचे सहकार्य महत्वाचे ठरल्याचे सांगत सौरभ ताम्हाणकर यांनी आभार मानले.












