सिंधुदुर्गचे माणिकमोती | बाळकृष्ण लळीत

लय सनना गो केला
डोयवरना माज्या पानी गो गेला…
आयच्या कुशीत
हुतय गो तवा
जीव माका लायलान बायोच्या घोवान…
आंब्याची कोय
चिचेचो बोय
लाडान देत हुतो मावसो हय..”
आ.सो.शेवरे यांची ‘डोळयान पानी माज्या झरता गो’ या शीर्षकाची एक मालवणी बोलीतील कविता आरती मासिकाच्या १९८६ सालच्या दिवाळी अंकात माझ्या वाचनात आली होती.त्या कवितेतील पुढील आशय आता आठवत नाही.पण मालवणी समाज जीवनातील भन्नाट अर्क ते त्या शब्दांत व्यक्त करत होते .मी लगेचच त्यांच्याशी संपर्क केला व मालवणी बोलीतून लिहिणा-याची साहित्य चळवळ आवश्यक आहे का?या संदर्भातील एकछापील पत्रक त्यांना पाठवले उत्तर आले “हो आवश्यक आहे तीच जीवनाला दिशा दाखवते.”
यापूर्वी त्यांचा ‘गंधारीची फुले ‘प्रकाशित झाला होता.पण ‘दफणवेणा’ते अधिक अंतर्मुख होत लिहिते झालेले दिसतात-
हातांना काही काम मिळत नाही तेव्हा डोळे आभाळाकडे निरखून पहातात
आणि आभाळही मुके होते
तेव्हा डोळे पापणीखाली निवारा शोधतात
पापणीलाही येतो पूर… डोळे जातात दूर..
पायाखालची जमीन काही तरी कुजबुजते
तेव्हा पायांना जाग येते आणि नकळत पाऊले वळतात घराकडे की ज्याला नसते छप्पर आणि नसते पेटती चूल.
(आभाळही मुके होते- ‘दफणवेणा’ पृ.१४.)
++
गंधारीची फुले-
‘गंधारी’….!
कोकणात एक दिसायला सुंदर पण काहिसा उग्र वासाचे फुलांचे झुडूत आढळते.स्थानिक बोलीत तीला ‘घाणेरी’असे उपहासाने म्हणतात….पण कवी आ.सो. शेवरे यांनी आपल्या पहिल्या कवितासंग्रहाला ‘गंधारीची फूले (१९८३) ‘हे नाव देऊन वाचकांचे लक्ष वेधले. या संग्रहाच्या मनोगतात ते लिहितात-”
“कूळकथा शब्द वळले तेव्हापासूनची….या शीर्षकाखाली
अखंड मानवजात बंधमुक्त व्हावी, तळचा माणूसही आनंदाने हसावा,खेळावा.त्याला चालण्याचे सामर्थ्यं मिळावे नव्या प्रकाशाची दिशा मिळावी.या आंतरिक तळमळीतून समाजाकडे पाहण्याची दृष्टी आणि सामाजिक जाण या दोन्ही गोष्टीनी मनात मोठे घर केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी माणुसकीची ‘हाक’ दिली,नव्या जाणिवा नि प्रेरणा गवसल्या.
गाडला गेलेला तळचा माणूस आकंठ मुक्तपणे बोलत, लिहित राहून सारा समाज ढवळून निघेपर्यंत लिहित रहायला हवा. माणूस माणसाला ओळखीपर्यंत संघर्षाची साथ करायला हवी. या विचारांनी मनाची बैठक पक्की झाली.सामाजिक क्षेत्रात काम करता-करता कवितेच्या दिशेने शुद्ध वळू लागले.समाजाशी अंतर्मुख होता होताच नकळतच कविता मनात घोळू लागली. तेव्हा तिला अक्षरबद्ध करीत इथपर्यंत आलो आहे.
१९७० ते आतापर्यंच्या माझ्या कविताना मी ‘ गंधारीची फुले’ या संग्रहात समाविष्ट केले आहे त्या तिथेच न थांबता सम्यक क्रांतीचा जयघोष करीत पुढे सरकत रहाणार आहेत. पाना-फुलांवर कविता करणे आज आम्हास परवडणारे नसले तरी निसर्गातील आनंद, त्याची भाषा,मर्मभेदी आणि सूचकता आम्ही नाकारित नाही.गंधारी हे एक उपेक्षित रानफूल.त्याला कोणी घाणेरीही म्हणतात,त्याचा वास उग्र आहे. पण फुलात निश्चित मोहकता आहे. त्याच्या गंधाला घाण वास असल्याने माणसाने त्याच्याकडे उपेक्षेने पाहिले.परंतु त्याची कार्यक्षमता गौरवपूर्ण वाटते. ऊन, पाऊस, वारा याची तमा न करता, पाणी मिळो न मिळो त्याचे एक वी कुठल्याही मातीत अथवा दगडावर जिथे पडेल त्या जागेत आपल्या गंधारी वंशाची वाढ करते. किंबहूना ते क्षेत्रच गंधारीने व्यापून टाकते.”
++
….आबा सोनू ऊर्फ आ.सो.शेवरे
यांचा जन्म १५ जुलै १९४६ रोजी देवगड तालुक्यातील कोर्ले या गावी झाला. पण अनेक वर्षे ते वास्तव्याला खारेपाटण येथे होते. गावी शिक्षण झाल्यावर तरूण आबा काही काळ सुरूवातीला खारेपाटण हायस्कूलमध्ये व नंतर एसटी मध्ये नोकरी स्वीकारली . पण नोकरी हा त्यांचा पिंड नव्हता.यात ते रमले नाहीत.
पुढे आयुष्याच्या एका वळणावर कविता भेटली आणि कवितेतून स्वतः व्यक्त करू लागले.
अर्थात कविता लिहून पोटाचा प्रश्न सुटत नाही हे ते जाणून होते.
मग अनेक तडजोडी करत ते आपले लौकिक जीवन जगु लागले पण समस्या असो प्रश्न असोत कवितेने त्यांना साथ दिली वा त्यांनीही तिला सोडाली नाही.व्यवहार,त्यातील खाचखळगे,त्यात कळत-नकळत कराव्या लागणाऱ्या छोटया-मोठय़ा तडजोडी, जगण्यासाठी कधी करावी लागणारी बनवेगिरी या असल्या गोष्टींपैकी काही म्हणजे काहीही आबांना कधीही जमले नाही. ‘स्वभावाने शांत,सरळ,आजची व्यवहारिक गणिते,बनवेगिरी यांच्या पासून दूर असलेले असल्याने व्यावहारिक जगात वैयक्तिक जीवनात त्यांची परवड झाली वणवण झाली पण ती त्यांनी कुणाकडे कधीच बोलून दाखवली नाही..त्यांच्याविषयी एका लेखात लिहिले आहे
“आपल्या आयुष्याच्या अंताआधी, त्या तथाकथित परमेश्वरास,त्याने मागताच दिलेली जात,द्वेष,मत्सर त्यालाच परत करण्याची इच्छा बाळगणारा हा अवलिया कवी एक छोटे वर्तळ
वगळता इतरत्र फारसा परिचित नव्हता. माणसाला नाकारून चालणार नाही, हे त्यांच्या कवितेचे आणि आयुष्याचेही सूत्र होते.कवितांमधून शब्दांच्या आधारे वाईट गोष्टींवर तीव्र प्रहार करणारा हा कवी, प्रत्यक्ष आयुष्यात वागायला,बोलायला अतिशय मृदू व हळवा.त्यांच्या निधनाचे वृत्त बुधवारी समाजमाध्यमांवर फिरले आणि गुरुवारी वृत्तपत्रांत आले,तेव्हा अनेकांना मुळात असा कुणी कवी होता आणि तो उत्तम कविता करायचा याची माहिती झाली. प्रसिद्धीखोर साहित्य व्यवहारांकडे शेवरे यांनी फिरवलेली सपशेल पाठ हे त्यामागचे एक प्रमुख कारण. ‘गंधारीची फुले’, ‘दफनवेणा’, ‘अंधारातला जागल्या’, ‘झिरो बॅलन्स असलेले माझे पासबुक’ हे त्यांचे काव्यसंंग्रह. त्यातील ‘झिरो बॅलन्स असलेले माझे पासबुक’ हे १९१६ सालीप्रकाशित झाले “( लोकसत्ता, समाज प्रसारमाध्यमातून साभार)
या कवितासंग्रहाच्या शीर्षकातच त्यांचे सारे जीवन डोळ्यांसमोर येते नि आपण समाज घटक म्हणून किती ‘कोडगेपणा’ने जगतो..याची जाणीव होते.
आजच्या काळात कविता इतकी सहज सोपी करुन टाकली आहे की अनेकदा’ हिला कविता म्हणावी का?’ पण १९७०-९० च्याकाळात आपल्या कवितेतून आंबेडकरवादी विचार , बंडखोरी,विद्रोह ठळकपणे त्यांनी मांडला आहे. कोकणातील कवितेत हे लेखन तसे नवीनच होते, पण आ.सो.शेवरेनी ते विचार मांडायलासुरवात करुन दिली. अर्थात आ.सों.ची कविता सहज सोपी नव्हती.
“त्यांचा विद्रोहाचे सूर फारच विरळा कवींच्या रचनांतून दिसायचे.समाजव्यवस्था, जातिव्यवस्था,भेदव्यवस्था, अंधश्रद्धा अशा अनेक कुप्रथांना धिक्कारणारी अशी आबांची कविता.८०च्या दशकात स्थानिक नियत- अनियतकालिकांतून त्यांना प्रसिद्धी मिळाली. आंबेडकरी विचार,परिवर्तनवादी विचार हा त्यांच्या कवितेचा पाया. हा असा पाया ज्यांच्या कवितांचा आहे असे अनेक कवी आज कोकणात दिसतात.त्यातील अनेक त्यासाठी आबांचे ऋण मान्य करतात,यावरून आबांचे मोठेपण लक्षात यावे”(लोकसत्ता)
++
मदन हजेरी यांनी त्यांच्या कवितेविषयी लिहिले आहे- “बदलत्या काळाबरोबर वास्तवही बदलत जाते.ज्या थरारक जीवनात कवी कटोरा घेऊन जगला.तहीही स्वत्त्व जोपासलं. सामाजिक राजकीय विचारांच्या नैराश्यमय स्थितीत आंबेडकरी प्रेरणेचे अंगार तळ हातावर घेऊन उभा राहिला.अपमान,अंधश्रद्धा, वेदना,यातना यांची राख बाजूला भरतानाच स्फोटक अंगार शदरुपाने गंधारीसारखे फुलवत राहिला.प्रकाशाचा वारा नजरेत साठवत,भूतकाळाच्या आठवणी गाडत तो चालत राहिला.मातीशी मस्ती आणि मातीतल्या माणसांचे हातवळक करण्यास सिद्ध झाला. त्या विद्रोही मनाचा मुक्त आविष्कार म्हणजे आ.सो. शेवरेंची कविता होय. ”
++
आपल्या वेदनादायी जीवनात पुढे सरकण्यास ज्यांनी मदत केली त्यांच्याविषयी ते नेहमी कृतज्ञता व्यक्त करीत.त्यांचे मित्र वीर शंकरराव पेंढारकर यांनी त्यांना जीवनात स्थिर केले व कवितेला सतत दाद दिली असे म्हणत.मदन हजेरी,गणपत पाटणकर,मधुसुदन नानिवडेकर, विलास कुवळेकर अशा अनेक सहकारी मित्रांचा उल्लेख ते करत.व्यवस्था आणि परंपरा यांच्या जोखडात सापडलेल्या माणसाला कोणी सहसा जवळ करत नाही,यावर ते लिहितात-
तुटलेले हात माझे
रुतलेले पाय माझे
परंपरेचे डोई ओझे
कोणी आहे सांग माझे?
‘हा’प्रश्न विचारणारा कवी होता. शब्दांचे महत्त्व जाणणारा कवी होता.माझ्या शब्दांनो शूर बना, वीर बना,निष्ठूर बना, सिंह बना, वरवराच्या रंगाना भुलू नका. बंड करून उठा… असे स्वतःला बजावणारा हा कवी आहे.
मी भोगी म्हणून भोगून गेलास
किनारा दूर ठेवून
आता माता म्हणून कर्तव्यच करीन
कुंतीला चार फुले वाहून.
(गं.फु. पृ. १०)
++
विद्रोहीपण-
.’आता आम्ही अंधाराच्या संतापाने पेटून उठलो आहोत. लेखणीही तलवार बनली आहे. आणि तू ज्यांच्यासाठी झिजलास त्यांच्यासाठी मी ती वापरणार आहे.डाॕ. बाबासाहेब यांच्याविषयी ते सदैव कृतज्ञता बाळगतात. ‘माणूसकीचा हक्क मागताना तू नव्या जाणीवांची साक्षेपी दृष्टी दिलीस.पंख तुटलेल्यांना सामर्थ्य दिलेस.”आता क्रांतीची नवी लाट उसळू दे.असा आग्रह ते करतात. (पृ. १७) त्यासाठी सारे मोह टाळायला हवेत हे सांगायला ते विसरत नाही. नव्या वाटा शोधायला हव्यात. सर्वाना सोबत घेऊन.स्वतःचा प्रकाश स्वतः बनायला हवे !”
असे आ.सो.शेवरे १९८३ साली म्हणत होते..
‘शोषणमुक्त मानवते’चे शिलालेख नोंदवायला हवेत असा ते आग्रह करतात..कवी विद्रोहाच्या वणव्यात स्वतः होरपळतो,तेव्हा ते ही ‘संस्कृती’ या शब्दांला
झिडकारतात.
तुझ्या चौकटीला बदलायला हवी आणि नवे रंग द्यायला हवे!’अशी अपेक्षा करतात.
++
आमच्या वस्तीत सारी गांधारीची फुले….तीच माळीण म्हटले तर लोक थट्टा करतील माझी आणि माझ्या फुलांचीही. तेव्हा अन्य प्रतिष्ठा प्राप्त फुलांची तुलना करतात.नाग,सोनचाफा,मोगरा अशी फुले आम्ही माळू नयेत ? मग मिळालेल्या फुलातील एक डोक्यात घातले..पण ते कोमेजलेले होते..आणि नंतर ते सांगतात आमच्या वस्तीत आजही गंधारी (घाणेरी)चीच फुले उमललेली आहे. येथे मला एक सांगावेसे वाटते याला ‘जबाबदार’ कोण? आजच्या समकालीन वास्तवाचा शोध घेतला तर ज्यांना प्रकाशाची वाट सापडाली ते आपल्यातील किती जण पुन्हा मागे आले ?अंधारात खिचपत पडणाऱ्यासाठी ?
आबा सोनू शेवरे हा कवी कोकण सोडले तर इतर प्रातांत वाचला, समजून तरी कोणी घेतला असेल का?सदरा,हिरे,नकार,मावळणारा सूर्य,दोस्त हो..या त्यांच्या कविता आजही ताज्या आहेत.आज कोकणाचा हा कवी नक्कीच परिवर्तनच्या लढाईतील ‘वाटाड्या’झाला असता कारण मतभिन्नता आहे, पूर्वग्रहदुषित मन त्यांच्यापाशी नाही. “माणसाच्या मळ्यात माणूसकीच्या तळ्यात ‘माणसाचेच गीत’गायला हवे”
असे सांगत होते.गरीबी नव्हे तर गरीबांनाच नष्ट करणाऱ्याच्या दिंडीत सामील झालेल्याचा ते धिक्कार करतात.
डिसेंबर १९९७ साली त्यांचा ‘दफणवेणा’ हा संग्रह मुंबईच्या संहिता प्रकाशनने प्रसिद्ध केला, त्याची राख,निवारा,पेरणीचा पाऊस? शबनम,पाखरां,पायभर वाटा,जखमी कबुतरांचे थवे,शहरातील निर्वासित खेडी अशा सर्वच कविता वाचकांनी मुळातून वाचायला हव्यात .
आपल्या’मृत्यूपत्र’ याकवितेत ते लिहितात-
“काल तू मला भेटलास
तेव्हा तला मी एक कागद दिला होता
तुला तो जपून ठेव असेही म्हणालो होतो.
कारण.. ते माझे मृत्युपत्र होते.
स्थावर मी नोंद केली आहे
सा-या सवलतीची आणि बेहिशेबी अन्यायांचीही..
तू देऊ केलेल्या सर्व सुखसोयी आणि दिलेली जातही
मी तुलाच परत करणार आहे याची नोंदही मृत्युपत्रात केली आहे.”
त्यांचे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले याशिवाय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ‘शालेय निबंध माला’ पुस्तिका, सोबत नाटक व कथा लिहिल्या.’प्रसंवाद’, धुरंधर’ या अ-नियतकालिकांचे संपादक म्हणून काम पाहिले.’ सम्यक साहित्य संसद’यावाङमयीन तर विकास प्रबोधिनी या सामाजिक संस्थांचे संस्थापक..ते होते, त्यांना बा.सी. मर्ढेकर, श्रीपाद काळे व अस्मितादर्श पुरस्कारांनी सन्मानित केले गेले दलित ग्रामीण साहित्य शब्दकोशाच्या तज्ज्ञसमितीत सहभाग घेतला होता.अखिल भारतीय दलित अकादमी,सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
सुनील हेतकर यांनी त्यांच्या वाङ्मयीन कार्यावर ‘आ. सो. शेवरे व्यक्ती आणि वाङ्मय ‘या नावाने समीक्षा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
++
कवी आ.सो.शेवरे आपला चौथा कवितासंग्रह ‘झिरो बॕलन्स असलेले माझे पासबुक'(२०१६)
वाचकांच्या हाती ठेवून त्यात वर्षी २६ आॕक्टोबर २०१६ रोजी दूरच्या प्रवासाला गेले….! आपल्या कविता उद्याच्या परिवर्तनशील वाटसरूंसाठी मागे ठेवून .!
—————————————
संदर्भ –
१.शेवरे आ.सो.,गंधारीची फुले’, स्पर्श प्रका. राजापूर,२६ मे १९८३.
२.आरती मराठी मासिक, सावंतवाडी,१९८६,पृ. ३८
३.आ.सो.शेवरे- व्यक्ती आणि वाङ्मय ,सुनील हेतकर ,हेतकर्स पब्लिकेशन.(युगांतर बुक तर्फे वितरण)
४.विशेष आभार -वीरधवल परब, प्रवीण बांदेकर.












