सिंधुदुर्गचे माणिकमोती | बाळकृष्ण लळीत.
————————————
‘ललित’ मासिकाच्या एका लेखात नाटककार मो.ग. रांगणेकर यांना उद्देशून’ठणठणपाळ’ लिहितात ,
“श्री मो.ग.रांगणेकर यांस-आपण मूळचे पत्रकार. तेही ….पत्रकार!अर्थात हे नव्याने सांगायला नको.आपण मूळचे सावंतवाडीचे एवढे सांगितले की पुरे! यातच सगळे काही आले. चिमटे घेणे,टोपी उडवणे या गोष्टी वाडकराला नवीन नाहीत. त्या आपण पत्रव्यसायात यशस्वीपणे केल्यात आणि सावंतवाडीचे नाव राखलेत याबद्दल आपले अभिनंदन…!”
(निवडक ठणठणपाळ, पृ,११६)
हे ‘ठणठणपाळ’ म्हणजेच आपले आरवलीकर नाटककार जयवंत दळवी.
++
सावंतवाडीचे सुपुत्र सुप्रसिद्ध नाटककार मो.ग.ऊर्फ मोतीराम गजानन रांगणेकर यांचा परिचय या लेखात करून घेऊया.नव्या पिढीतील मराठी नाट्य रसिकांना कदाचित हे नाव माहित नसेल पण एक काळ असा होतो की, संपूर्ण मराठी नाट्यव्यवसाय बोलपटामुळे धोक्यात आला होता;तेव्हा सावंतवाडीच्या सुपुत्राने नाट्यलेखनासाठी लेखणी हाती घेतली,स्वतःची ‘नाट्यनिकेतन’ ही संस्था मुंबईत स्थापन करून मराठी नाट्यसृष्टीला संजिवनी दिली. असे नाट्य जाणकारानी लिहून ठेवले आहे आणि ते सत्य आहे.
मोतीराम गजानन रांगणेकर १०एप्रिल १९०७ झाला.
ते केवळ मराठी नाटककार नव्हते तर चित्रपट दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी कार्य केले.
मराठी पत्रकारही होते.यांनी लिहिलेली कुलवधू,आशीर्वाद, नंदनवन,माझे घर,वहिनी इत्यादी नाटके विशेष गाजली.
नाट्यविषयक योगदानासाठी इ.स. १९८२ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले आणि
)त्या पूर्वी १९६८ साली म्हापसे (गोवा) येथे झालेल्या ४९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
++
प्रसिद्ध मराठी नाट्यसमीक्षक डॉ. वि.भा.देशपांडे यांनी त्यांच्या नाट्यविषयक योगदानाची’ मराठी नाट्यकोशा’त दखल घेताना म्हटले आहे-
“मो ग. रांगणेकर यांच्या नाट्यलेखनाला प्रस्तुत कालखंडातच आरंभ झाला. नंतरच्या काळात त्यांच्या नाट्यलेखन – प्रयोगाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. १९४० ते ५० या दशकातील त्यांची नाट्यकामगिरी रंगभूमीच्या भरणपोषणाला कारणीभूत झाली. नाट्यमन्वन्तरच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ‘नाट्यनिकेतन’ या नाट्यसंस्थेचे कार्य आरंभित झाले. फक्त एकाच दुव्याने या दोन संस्था बांधल्या गेल्या होत्या, तो दुवा म्हणजे ज्योत्स्नाबाई भोळे. त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द ‘नाट्यमन्वन्तर’ मध्ये सुरू केली आणि ‘नाट्यनिकेतन’ मध्ये त्यांच्या अभिनयाची विकसित रूपे पाहावयास मिळाली. मो. ग. रांगणेकर हे जसे नाटककार आहेत तसेच ते दिग्दर्शक, नाट्यनिमति, संस्था चालक-मालक आहेत. नाटकात कोणत्याही तऱ्हेची प्रायोगिकता वगैरे न मानता नाटक हा एक व्यवसाय आहे या दृष्टीनेच त्यांनी आपले नाट्यकार्य चालू ठेवले. तत्कालीन समाजाची, रंगभूमीची परिस्थिती समोर ठेवून गरजेप्रमाणे आपले लेखन आणि प्रयोग यांचे गणित त्यांनी मांडले.
भवतालच्या समाजातील काही विषयांची निवड केली. विशेषतः मध्यमवर्गीय मराठी समाजातील काही विषय घेतले. त्यांनी लिहिलेली नाटके अशी ‘कुलवधू’, ‘नंदनवन’, – ‘आशीर्वाद’, (नंतरच्या काळातील ‘माझे घर’, ‘एक होता म्हातारा’, ‘रंभा’, ‘लिलाव’, ‘कोणे एके काळी’, ‘भटाला दिली.
ओसरी’ इत्यादी) या नाटकांत निरनिराळ्या प्रकारचे कौटुंबिक प्रश्न घेऊन त्याभोवती गुंफण केलेली आहे. या सर्वच नाटकांचे कमी – अधिक प्रमाणात प्रयोग यशस्वी झाले. पण त्यातही ‘कुलवधू’ नाटकाने रांगणेकरांना भरीव यश दिले. रांगणेकर स्वतःच नाटककार, दिग्दर्शक, संस्थामालक असल्याने आपल्याकडे उपलब्ध नटसंच कोणता आहे, मराठी प्रेक्षकांना काय हवे आहे याचा वेध घेऊन त्यांना आपली नाट्यनिर्मिती करता आली.सौम्य विनोद, माफक प्रमाणात संगीताचा वापर केला. या संगीतात गीते – भावगीते सदृशरचना यांचे प्रमाण महत्त्वाचे ठेवले. एका बाजूने चित्रपटाचा प्रेक्षक रंगभूमीकडे आणायचा होता, दुसऱ्या बाजूने वरेरकर, अत्रे यांच्या नाटकांनी निर्माण केलेला प्रेक्षक समोर होता. हे सारे डोळ्यासमोर ठेवून नाटके बेतणे चालू होते. रांगणेकरांना रंगभूमीकार्यात आलेले यश हे जसे त्यांच्या कर्तृत्वाचे आहे तसेच त्यांना मिळालेल्या कलाकारंचेही आहे. ज्योत्स्नाबाई भोळे यांच्यासारखी भावपूर्ण चेहऱ्याची, आकर्षक व्यक्तिमत्वाची, सुरेल आवाजाची कलावती रांगणेकरांच्या बहुतेक सर्व नाटकांना नायिका म्हणून लाभली. त्याचा त्यांना खूपच फायदा झाला. – याशिवाय मा. अविनाश (गणपतराव मोहिते), मामा पेंडसे, पु. – ल. देशपांडे, श्रीपाद जोशी, स्नेहप्रभा प्रधान, प्रभाकर पणशीकर अशी कितीतरी महत्त्वाची कलाकार मंडळी रांगणेकरांच्या नाटक कंपनीत होती. रांगणेकरांना आणि यातल्या अनेकांना १९४३ -४४ नंतर उदंड कीर्ती, प्रतिष्ठा लाभली त्यामुळे त्यांचा विचार प्रस्तुत ठिकाणी मर्यादितपणे केलेला आहे.”
++
प्रसिद्ध समीक्षक प्रा.गं.बा. ग्रामोपाध्ये लिहितात-
“रांगणेकरांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीबद्दल प्रेक्षकांच्या मनात आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण केला. एकांकी, एकप्रवेशी तंत्राने लिहिलेल्या आपल्या नाटकांतून मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रचलित प्रश्न रांगणेकरांनी सुटसुटीतपणे मांडले. स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनी करण्यावर तसेच नेपथ्य वास्तववादी ठेवण्यावर त्यांचा कटाक्ष होता. संगीताचा उपयोगही त्यांनी चातुर्याने केला, ते त्यांनी माफक ठेवले.त्यांनी काही एकांकिकाही लिहिल्या आहेत.”
++
नाट्यकर्तृत्व-
१९४१ च्या विजयादशमीला रांगणेकरांनी नाट्यनिकेतनची स्थापना केली तेव्हा ‘आशीर्वाद’ या संस्थेचे पहिले नाटक होते. त्यानंतर रंगभूमीवर आलेल्या ‘कुलवधूं नाटकाने इतिहास घडवला. स्वतः लिहिलेल्या वीस नाटकांप्रमाणेच आणि एकांकिकेप्रमाणे त्यांनी अ.ना. वर्टी, मामा वरेरकर, मो.द. ब्रह्मे, ल. ना. भावे,आचार्य अत्रे प्रभूतींची नाटकेही रंगभूमीवर आणली.”
मो.ग.रांगणेकरांनी लिहिलेली किंवा दिग्दर्शित केलेली नाटके-
‘अपूर्व बंगाल’ (मराठी नाटक), दिग्दर्शन ‘संगीत अमृत'(मराठी नाटक)१९५८,’अलंकार'(मराठी नाटक) १९४४ ‘आले देवाजीच्या मना’ (मराठी नाटक)१९६९ ‘संगीत आशीर्वाद’ (मराठी नाटक)१९४१ ‘आश्रित'(मराठी नाटक) दिग्दर्शन संगीत ‘एक होता म्हातारा'(मराठी नाटक) १९४८ ‘कन्यादान'(मराठी नाटक) १९४३ ‘संगीत कुलवधू’ (मराठी नाटक)१९४२ ”संगीत कोणे एके काळी’ (मराठी नाटक)१९५० लेखन.जयजयकार (मराठी नाटक) १९५३ लेखन धाकटी आई (मराठी नाटक) १९५६ ‘तो मी नव्हेच’ (मराठी नाटक) दिग्दर्शन ‘देवाघरची माणसं’ (मराठी नाटक) दिग्दर्शन. ‘धन्य ते गायनी कळा’ (मराठी नाटक) दिग्दर्शन ‘नंदनवन’ (मराठी नाटक) १९४२ ‘पठ्ठे बापूराव’ (मराठी नाटक) दिग्दर्शन ‘पतित एकदा पतित का सदा?’ (मराठी नाटक) १९६५ लेखन ”बडे बापके बेटे’ (मराठी नाटक) दिग्दर्शन ‘भटाला दिली ओसरी’ (मराठी नाटक) १९५६ लेखन भाग्योदय (मराठी नाटक) १९५७ लेखन ‘भूमिकन्या सीता’ (मराठी नाटक) दिग्दर्शन ‘माझे घर'(मराठी नाटक) १९४५ लेखन ‘माहेर'(मराठी नाटक) १९५१ लेखन मी एक विदूषक (मराठी नाटक) दिग्दर्शन ‘मीरा मधुरा’ (मराठी नाटक) दिग्दर्शन ‘रंभा'(मराठी नाटक) १९५२ लेखन राणीचा बाग (मराठी नाटक) दिग्दर्शन राधामाई (मराठी नाटक) दिग्दर्शन लिलाव (मराठी नाटक),१९५५ लेखन लेकुरे उदंड जाहली (मराठी नाटक) दिग्दर्शन संगीत वहिनी (मराठी नाटक) इ.स. १९४५ लेखन हिमालयाची बायको (मराठी नाटक) लेखन हिरकणी (मराठी नाटक) दिग्दर्शन हेही दिवस जातील (मराठी नाटक) १९६१ लेखन (सहलेखक: वसंत सबनीस, ग. दि. माडगूळकर) हृदयस्वामिनी (मराठी नाटक) दिग्दर्शन. अशाप्रकारे नायलेखन ,दिग्दर्शन व गीत लेखन करून त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.नाटककार मो.ग. रांगणेकर यांच्या विषयी कविवर्य गंगाधर महाम्बरे लिहितात-
“विसाव्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात संगीत मराठी रंगभूमीचे युगप्रवर्तक नाटककार, मो.ग.रांगणेकर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झाले. अत्यंत प्रतिकूल वातावरणामध्ये मराठी संगीत रंगभूमी यशस्वीरीत्या चालवून, नाटककार, नाट्यनिर्माता आणि नाट्यदिद्गर्शक या त्रिविध नात्यांनी रांगणेकरांनी लक्षणीय कामगिरी केली.केवळ मॅट्रिकपर्यंत शिकलेल्या रांगणेकरांनी वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षापासून अनंत धडपडी केल्या. मॅट्रिक होताहोताच वयाच्या सतराव्या वर्षी त्यांच्या संपादकत्वाखाली ‘अरुण’ या शीर्षकाचे छापील मासिक निघाले. त्यानंतर ‘विविधवृत्तं सारख्या नामांकित नियतकालिकाच्या संस्थेने जे ‘तुतारी’ साप्ताहिक काढले, त्याचे ते संपादक झाले. ‘आशा’, ‘चित्रा’, ‘वसुंधरा ही साप्ताहिके आणि ‘सत्यकथा’ चे ते पहिले संपादक होते. पत्रकारितेबरोबरच रांगणेकरांनी ‘सीमोल्लंघन’ आणि ‘मृगजल’ या दोन कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांचे ‘रांगणेकर’ हे विनोदी लेखांच्या संग्रहाचे पुस्तक एके काळी महाराष्ट्रात खूप गाजले.”( भैटीलागे,पृ.४२)
++
गीतकार म्हणून त्यांनी लिहिलेली गीते आजही रसिकांना आठवतात-
‘आली तुझ्या दारी अंतरिच्या खुणा’, ‘माझ्या कितीतरी आतुर प्रेम अपुले’, कां रे ऐसी माया कां वदती अशा’,’वचना छंद तुझा मजला कां’,’जा जा ग सखी जाऊन’.’तुझं नि माझं जमेना’,’ दे मज देवा जन्म’, ‘हा दोन जिवांचें प्रेम बिचारें ‘,’ वळुन बघू माघारी’ ‘नदीकिनारी नदीकिनारी’
‘नाच हृदया आनंदें’,’पांखरा जा त्यजुनिया’, फुलल्या जीवनीं सुंदर’ ‘बैसले मी पायथ्याशी’,’बोला अमृतबोला’
भाग्यवती मीं त्रिभुवनं’,’मधुर वचना मी मुकलें’ ,’मनरमणा मधुसूदना’, ‘रुसली राधा रुसला माधव’अशी असंख्य गीते जुन्या काळात रसिकप्रिय होते. गीतकार म्हणूनही मो.ग.रांगणेकर यांनी उल्लेखनीय लेखन केले.
++
आपल्या ‘भेटी लागी’ या लेख संग्रहात गंगाधर महाम्बरे यांनी त्यांच्यावर एक लेख लिहिला आहे. ते लिहितात-
“नाटककार मो.ग. रांगणेकर
“विसाव्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात संगीत मराठी रंगभूमीचे युगप्रवर्तक नाटककार, मो. ग. रांगणेकर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झाले.अत्यंत प्रतिकूल वातावरणामध्ये मराठी संगीत रंगभूमी यशस्वीरीत्या चालवून, नाटककार,नाट्यनिर्माता आणि नाट्यदिद्गर्शक या त्रिविध नात्यांनी रांगणेकरांनी लक्षणीय कामगिरी केली.केवळ मॅट्रिकपर्यंत शिकलेल्या रांगणेकरांनी वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षापासून अनंत धडपडी केल्या.मॅट्रिक होताहोताच वयाच्या सतराव्या वर्षी त्यांच्या संपादकत्वाखाली ‘अरुण’ या शीर्षकाचे छापील मासिक निघाले. त्यानंतर ‘विविधवृत्तं सारख्या नामांकित नियतकालिकाच्या संस्थेने जे ‘तुतारी’ साप्ताहिक काढले, त्याचे ते संपादक झाले. ‘आशा’, ‘चित्रा’, ‘वसुंधरा ही साप्ताहिके आणि ‘सत्यकथा’चे ते पहिले संपादक होते.पत्रकारितेबरोबरच रांगणेकरांनी ‘सीमोल्लंघन’ आणि ‘मृगजल’ या दोन कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांचे ‘रांगणेकर’ हे विनोदी लेखांच्या संग्रहाचे पुस्तक एके काळी महाराष्ट्रात खूप गाजले.”( भैटीलागे,पृ.४२)
++
बोलपटाचे निर्माते –
“वसुंधरांचे संपादक असताना सरस्वती सिनेटोनच्या दादासाहेब तोरणे यांनी रांगणेकरांकडून ‘औट घटकेचा राजा’ ही चित्रपटकथा लिहवून घेतली होती. ‘कुबेर’ आणि ‘सुवर्ण मंदिर’ हे दोन बोलपट रांगणेकरांनी काढले होते. सुरू झाल्यावर ‘प्रभात फिल्म’ कंपनीसाठी मुक्या महिलेची प्रमुख भूमिका असलेले एक कथानक रांगणेकरांनी लिहिले होते आणि त्यावर बोलपट काढायला ‘प्रभात कंपनी ने तयारीही दाखवली होती. परंतु आर्थिक व्यवहाराच्या अटी शांतारामबापूंना मान्य न झाल्यामुळे तेव्हा ती रांगणेकरांची कथा पडद्यावर आली नाही.
१९२४ साली रांगणेकरांनी सुरू केलेला वृत्तपत्र व्यवसाय १९३९ मध्ये संपुष्टात आला.” पुढे त्यांनी नाट्यव्यवसारय व नाट्यालेखन याना वाहून घेतले.
++
मुंबई सोडून आयुष्याच्या शेवटी ते पुण्याला रहायला आले.तेथे त्यांच्या कन्या वंदना खांडेकर व आदरणीय ज्योत्स्नाताई भोळे यांनी खूप काळजी घेतली..असे नोंद करून महाम्बरे लिहितात,
“१९९२ साली ‘कुलवधूंच्या सुवर्णमहोत्सवाच्या वेळी पुणे आकाशवाणीवरूनच एक तासाचा एक खास कार्यक्रम सादर केला आणि तो महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून एकाच वेळी प्रक्षेपित झाला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगणेकर आणि मी पुन्हा जवळ आलो.मी लिहिलेले ‘भारतरत्न सत्यजित रे’ हे पुस्तक रांगणेकरांना अर्पण करताना अर्पण पत्रिकेत ‘माझे पिश्रुतुल्य स्नेही’असा त्यांचा उल्लेख केला आहे.अखेरच्या दिवसातील रांगणेकर मला तसे हताश झालेले पाहायला मिळाले नाहीत.मित्रवर्य जयवंत दळवींच्या निधनानंतर मात्र म्हणाले, “आता मी तरी कशाला जगू रे?”आपल्या अंगात ताकद नाही म्हणून नाहीतर आजही मी एखादे साप्ताहिक काढून यशस्वी करून दाखवले असते, असे ते वारंवार म्हणत.
कोकणी बाणा आणि विनोदी स्वभाव-
गंगाधर महाम्बरे यांनी त्यांच्या विषयी आठवण सांगितली आहे. “पुण्यामध्ये एकलकोंडेपणाचे जीवन जगत असताना एकदा रांगणेकरांबरोबर
मी(गंगाधर महाम्बरे) त्यांच्या ‘सुनीत’ या निवासस्थानाशेजारील कमला नेहरू पार्कमध्ये फिरायला गेलो होतो.तिथे त्यांच्याकडे एक लहान मुलगा आला आणि म्हणाला, ‘आजोबा, तुमची काठी कुठं आहे?’
रांगणेकर म्हणाले, “मी म्हातारा झाल्यामुळे मला कुणी नोकरीला ठेवत नाही. नोकरी नाही म्हणून काठी विकत घ्यायला पैसे नाहीत.त्या मुलाला रांगणेकरांचे हे बोलणे खरे वाटले. परंतु रांगणेकरांनी मग म्हातारा झालो तरी आपल्याला काठी लागत नाही हे पटवण्यासाठी तिथल्या तिथे थोडे फिरून दाखवले होते. माणसाला दीर्घायुष्य मिळाले तर त्याने जोडलेली जिवाभावाची मित्रमंडळी आधी अंतरतात आणि नव्याने कुणाशी दोस्ती करता येत नाही.”
++
दि. १ फेब्रुवारी१९९५ रोजी कुटुंबियांशी गप्पा मारत असतानाच अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांचे निधन झाले.
++
मला अशा या महान सिंधुरत्नाला नाटकावर बोलताना.. पहाता आले. पुण्यात १९८८ साली सेनापती बापट रस्त्यावरील एका स्थळी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते…मो.ग. रांगणेकर.(‘तो मी नव्हेच’चे दिग्दर्शक होते.) डोक्यावर काळी टोपी अंगात काळा कोट आणि पांढरे शुभ्र धोतर अशा वेशातील मो.ग. रांगणेकर मला आजही आठवतात.
सावंतवाडीकरांनी कधीतरी त्यांचा भव्य नागरी सत्कार करायला हवा होता..पण बहुधा तो राहून गेला असावा..! असो.
—————————————
१.निवडक ठणठणपाळ,जयवंत दळवी ,मॕजेस्टिक प्रका. मुंबई .
२ मराठी नाट्य कोश, वि. भा. देशपांडे ,
३.भेटीलागी,गंगाधर महाम्बरे,निशिराज पब्लि. पुणे २००७