सिंधुदुर्गचे माणिकमोती | बाळकृष्ण लळीत.

————————————–
—- मला स्पष्टपणे आठवते एकदा मुटाटहून कुंभवडे या माझ्या मूळगावी आई, मी व वडील होडीने प्रवास केला होता. १९७०-७५ या काळात माझी चुलत भावंडे मुटाटच्या माध्यमिक शाळेत खास शिक्षण घेण्यासाठी खोली घेऊन रहात होती. तेव्हा नव्यानेच निर्माण होणारी शाळा मी पाहिली आहे.त्याकाळी त्या परिसरातील एक नामवंत माध्यमिक शाळा म्हणून डाॕ.श्रीधर रघुनाथ लेले या शाळेला मान्यता होती आणि आजही आहे.या माध्यमिक शाळेला ज्यांचे नाव दिले गेले ;ती महान व्यक्ती म्हणजेच सिंधुरत्न
डॉ.श्रीधर रघुनाथ लेले होय.
…आपल्यापैकी अनेकांनी ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला नक्कीच पाहिला असेल. या किल्ल्याच्या अलिकडे ‘मुटाट’ हे खाडी किनारी असलेले निसर्गरम्य गाव आहे.येथील डॉ. श्री.र.लेले माध्यमिक विद्यालय हे या पंचक्रोशीतील नामवंत म्हणून प्रसिद्ध आहे.अवघ्या शंभर दीडशे मुलांच्या संख्येवर सुरू झालेल्या या विद्यालयात आता जवळ-जवळ पाचशे विद्यार्थी शिक्षण घेतात आणि विशेष म्हणजे त्यात सुमारे २००
‘सिंधुकन्या’आहेत. खुद्द मुटाट शिवाय पाळेकरवाडी,मणचे,
वाघोटन,सडेवाघोटन,रेडेटाका
सौंदाळे येथील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्य ही शाळा घडवत आहे. पण या शाळेला ज्या व्यक्तींचे नाव आहे त्यांच्याविषयी अनेकांना फारच कमी माहिती असेल.
++
जीवन परिचय-
महाराष्ट्राच्या भूमीत ज्या सुपुत्रांनी जन्म घेतला व ज्यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे,तर भारताच्या औद्योगिक अभिवृध्दीसाठी आपले जीवन वेचले अशा यशस्वी आणि नामवंत व्यक्तिमध्ये डॉ.श्रीधर रघुनाथ लेले यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. डॉ.श्रीधर रघुनाथ लेले महाराष्ट्रातील सुप्रसिध्द ‘बोरोसील ग्लास वर्क्स’चे मॅनेजिंग डायरेक्टर होते.काच इंडस्ट्रीमधील विख्यात तज्ज्ञ आणि संशोधक म्हणून प्रसिध्द होते.
++
जन्म-शिक्षण-
.. तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातील (आता सिंधुदुर्ग) मुटाट या गांवी दि.१ मार्च १९०९ रोजी डॉ.लेले यांचा जन्म झाला.मुटाट येथे प्राथमिक शिक्षण झाल्यावर राजापूर हायस्कूल मधून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.बडोदा कॉलेजमधून पी.एस.सी. ची व ऑफ सायन्स एम.एस.सी. पदवी मिळविली. इ.स. १९३४ ते १९३६ या कालामध्ये त्यांनी विज्ञान विषयाचे लेक्चरर म्हणून काम केले.
लंडनकडे प्रयाण-
ही त्यांच्या जीवनाला मिळालेली मोठी कलाटणी होती.त्यांना
विज्ञान विषयातील निपुणतेमुळे ‘लिमये तांत्रिक शिष्यवृत्ती’ त्यांना मिळाली.त्यांनी लंडनमध्ये ‘लंडन विद्यापीठा’ची पीएच.डी. मिळविली.त्यांनी ‘सिटी ऑफ गिल्ड इन्स्टिट्युट’ लंडनची रेडिओ कम्युनिकेशनची परीक्षाही दिली. त्यांच्या शिक्षणाचा आणि ‘कर्तृत्वाचा इन्स्टिट्युट ऑफ ब्रिटीश इंजिनिअर्स ‘आणि ‘इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी’ लंडन या संस्थांनी आपले सन्मान्य सभासद नेमून बहुमान केला.
स्वतंत्र व्यवसायाची सुरुवात-
इ. स. १९३९ साली भारतात आल्यानंतर डॉ.लेले यांनी आपला अनुभव शिक्षण व संशोधन याचे बळावर ‘इंडस्ट्रीयल अॕण्ड इंजिनिअरींग आॕपरेटस् ‘ या कंपनीची स्थापना केली. कंपनीने बोरोसील या खास काच उत्पादनाची निर्मिती करुन आपल्या प्रगतीचा आणखी महत्त्व पूर्ण टप्पा गाठला.ही बरोसील काच अत्यंत प्रखर उष्णतेला टिकणारी आणि औषधी रसायनांनी कोणताही परिणाम न होणारी आहे. त्याचा उपयोग विशेषतः रक्तदानाकरिता लागणाऱ्या बाटल्या, काचेची शास्त्रीय उपकरणे वगैरेसाठी होतो.
पाश्चात्य कंपनीशी सहकार्य-
इ. स. १९६२ साली भारत व अमेरिका सहकार्याने बोरोसील ग्लास वर्क्स लि.,ही कंपनी अस्तित्वात आली. कॉर्निंग ग्लास वर्क्स ही अमेरिकन कंपनी आणि इंडस्ट्रीयल अॕण्ड इंजिनिअरींग आॕपरेटस् कंपनी प्रा. लि.,ही भारतीय कंपनी यांनी मिळून बोरोसिलची स्थापना केली. इंडस्ट्रीयल इंजिनिअरींग आॕपरेटस् कंपनी १ जानेवारी १९६३ पासून तिच्यात विलीन झाली.सायंटीफिक व टेक्निकल ग्लास व काचेच्या वस्तू ही कंपनी तयार करत असे, मूळ भारतीय कंपनीचा कारखाना अंधेरी येथे आहे.भारतीय उद्यमशीलता आणि अमेरीकेची तांत्रिक व आर्थिक मदत यांच्याच संयोगाने हा उद्योग आता भरभराटीला आला.कंपनीचे बरेचसे उत्पादन औषध कंपन्याच खरेदी करतात.
“बोरोसिलिकेट काच : ही मुख्यतः गारेची वाळू ७५-८०%, बोरिक
ऑक्साइड (B♭O) १०- १२%, सोडा व ॲल्युमिना २-४% यांचे मिश्रण वितळवून बनविलेली असते.अंतःक्षेपणे (इंजेक्शने) व इतर औषधे ठेवण्याच्या कुप्या व बाटल्या रसायनतः स्थिर असाव्या लागतात.म्हणजे त्यांचा व त्यांच्यात ठेवलेल्या औषधांचा एकमेकांवर परिणाम होणार नाही अशा त्या असाव्या लागतात.बोरोसिलिकेट काच अशाच प्रकारची असते.तिचा प्रसरण गुणांकही अल्प असतो. तापमानाच्या फेरबदलाने ती सहज तडकत नाही.रासायनिक द्रव्ये साठविण्यासाठी व प्रयोग करण्यासाठीही ती उपयुक्त असते.पायरेक्स,मोनॅक्स, हायसिल, बोरोसिल,सिकॉल इ. व्यापारी नावांनी प्रसिद्ध असलेल्या काचा बोरोसिलिकेट काचांपैकीच होत.”( म. वि.को. खं.३ पृ.५६६)
थोडे काचेविषयी-
वाचकहो..! .. हा लेख विस्तारतो आहे याची मला पूर्ण कल्पना आहे; पण ज्या काच निर्मिती या विषयात डॉ.लेले साहेब तज्ज्ञ होते; त्या ‘काचे’संदर्भात अगदी थोडक्यात माहिती करून घ्यावी असे मला वाटते.
“पहिली मानवनिर्मित काच ही इ.स.पूर्व १०००० ते ३०००वर्षे या काळात तयार झाली असावी असे म्हटले जाते. इ.स. सन पूर्व सुमारे १५०० ते ३००या काळात इजिप्त हे काचकलेचे केंद्र होते.तेथे उघड्या साच्यात दाबून काचेच्या वस्तू बनवल्या गेल्या असा उल्लेख सापडतो. रोम ,व्हेनिस,अमेरिका फ्रान्समध्ये आधुनिक काळात उत्तम दर्जाच्या काचा बनवल्या गेल्या.काचेच्या बांगड्या किंवा मणी यासारख्या वस्तू तयार करण्याचा उद्योग भारतात प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. पण आधुनिक काच व्यवसायाची सुरुवात १९ व्या शतकात(१८७०) पंजाब मधील झेलम येथे झाली.फाळणीनंतर हे गाव पाकिस्तानात गेले.पुढे जपान, जर्मनी यांच्या सहकार्याने हैदराबाद,मुंबई, बडोदा,जबलपूर, सोधपूर( बंगाल) येथे काच कारखाने निघाले.सिलिका काच, अल्कली सिलिकेट काच,
प्रकाशीय काच,रंगीत काच, असे काचेचे काही प्रकार आहेत. त्यात वैद्यकीय दृष्टीने ‘बोरोसि लीकेट काच’ ही फार महत्त्वाची आहे.” (म.वि.कोश, खंड ३,१९७६,पृ.५६६)
..शास्त्रीय काच मालाचे उत्पादन हे देशाच्या शास्त्रीय व तांत्रिक प्रगतीचे दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. त्याच्या विकासालाही अधिकाधिक वाव आहे.याच्या आधारावर अनुषंगित उद्योगधंदे वाढीस लागतील.आपल्या देशात या इंडस्ट्रीचे भवितव्य उज्वल आहे.असे डॉ.लेले यांचे मत होते. उत्तम व्यवस्थापन,तंत्रज्ञ,कुशल मजूर आणि भांडवलाचा पुरवठा या गोष्टीची सुविधा विपूल प्रमाणात लाभल्यास जगातील बाजारपेठेत ही इंडस्ट्री स्वयंपूर्ण व उज्वल बनेल असे त्यांचे मत होते.
काच निर्मिती व्यवासायतील तांत्रिक बादशहा-
डॉ. लेले यांनी काच धंद्यातील दृष्टी केवळ आपल्या वैयक्तिक मर्यादपूरती न राखता देशातील काच धंदा वर्धमान कसा होईल याकडे राबविली. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात भारत सरकारला त्यांनी आपले संशोधन कार्याची यशस्वी झलक आणि महत्त्व पटवून दिले. आज ‘बोरोसिलीकेट ग्लास जी अनेक प्रयोगशाळेतून, रुग्णालयातून एक दर्जेदार काच म्हणून समजली जाते, त्याची निर्मिती डॉ. लेले यांच्याच संशोधन प्रवृत्तीतून झाली.डॉ. लेले यांची काच धंद्यातील तांत्रिक कुशलता पाहून अनेक लोकाभिमुख संस्थांनी त्यांना सदस्य म्हणून नियुक्त करून त्यांचा बहुमान केला. १९५७ ते १९६१ या काळात ते ‘सोसायटी ऑफ ग्लास टेक्नॉलॉजी शेफिल्ड’चे भारतीय विभाग अध्यक्ष होते.भारत सरकारच्या ‘डेव्हलपमेंट कौन्सिल फॉर ग्लास अॕण्ड सिरॅमिक्सचे’ चेअरमन होते. ‘ऑल इंडिया ग्लास मॅन्युफॅक्चरर्स फेडरेशन’चे ते अध्यक्ष होते. ‘सेंट्रल ग्लान अॕण्ड सिरॅमिक्स रिसर्च इन्स्टिट्युट’कलकत्ताचे ते सदस्य होते. या शिवाय इतर अनेक लोकाभिमुख शैक्षणिक संस्थांच्या प्रगतीला त्यांनी हातभार लावला होता. देवगड एज्युकेशन सोसायटीचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले.
अनेक गरजू बंधूभगिनीना ते आर्थिक व वस्तूस्वरूपात मदत करत. थंडीच्या दिवसात अनेकांना ते वुलनचे कपडे भेट देत असत.घराजवळच्या गणपती मंदिरात दर्शन घेणारे डाॕ.लेले अनेकांना आपला आधार वाटे.
++
शैक्षणिक आस्था : मुटाट शिक्षण संस्थेची स्थापना-
आपल्या परिसरातील मुलांनी शिकावे,मोठे व्हावे व ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाचा लाभ मिळावा ही डॉक्टरांची मनीषा होती व म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था मुटाट ता.देवगड येथे स्थापन केली.त्याचवेळी शाळेअभावी त्यांना दुसऱ्या गावी शिकण्यासाठी जावे लागत होते. मुटाटला शाळा निघाल्यामुळे आजूबाजूच्या ५ मैलातील विद्यार्थ्यांची शाळेची गरज भागली आहे. याशिवाय कित्येक शैक्षणिक मंडळांवर डॉक्टरांनी काम केले.आज सुसज्ज ग्रंथालय असलेल्या या माध्यमिक शाळेत सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेतात त्यात २०० ‘सिंधुकन्या’ आहेत.विद्यार्थ्यांसाठी शाळेत व्यायामशाळाही आहे. सुरुवातीच्या काळात वामन गणेश नवरे,सीताराम रामकृष्ण प्रभुदेसाई, राजाराम लक्ष्मण सुपले यांनी वा सहकारी शिक्षक- ग्रामस्थ यांनी या शाळेला नावारूपाला आणले. २०१६ पासून श्री.दिलीप तुकाराम घरपणकर हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. १९९२पासून मा.घरपणकर सर या प्रशालेत इंग्रजीचे अध्यापन करीत आहेत.अनेक डॉक्टर,अभियंते या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.नामवंत जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीयुत. सातवळेकर हे याच शाळेचे विद्यार्थी होत.अशाप्रकारे मुटाटची डॉ.श्री.र.लेले माध्यमिक शाळा ही या परिसरातील एक भावी पिढीसाठी एक उज्ज्वल भवितव्य घडवणारी जीवनदायिनी आहे.
++
डॉ.श्रीधर रघुनाथ लेले आणि महाराष्ट्राचे तत्कालीन नगरविकास मंत्री नामदार पु.ग. खेर यांच्या उपस्थितीत दिनांक १ मार्च १९६९ रोजी तीन वर्गखोल्यांच्या नामकरणाचा संस्मरणीय कार्यक्रम झाला. पण मुटाटकरांच्या दुर्दैवाने डॉक्टरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा शेवटचा कार्यक्रम ठरला.पुढील काही दिवसात नाट्यमय घडामोडित डाॕक्टरानी ‘बोरोसील’ च्या अध्यक्षपदाचा १० एप्रिल १९६९ रोजी त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर अल्पावधीत २० एप्रिल १९६९ रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले.अशा या महान सिंधुरत्नांची आठवण प्रेरणादायी आहे म्हणून त्यांचे स्मरण सातत्याने केले पाहिजे.
———————————–
संदर्भ व सहकार्य –
१.मराठी विश्वकोश,खंड -३
२. श्री.र.लेले यांच्या संदर्भातील
जीवन परिचय पत्रक
विशेष आभार
१. डॉ.विनय केळकर.
२. मा.दिलीप घरपणकर












