लांजा नगरपंचायतीमार्फत भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण मोहीम सुरू

सोमवारी २० नोव्हेंबर रोजी शहरातून १५ ते २० कुत्री पकडली, लांजा नागरिकांतून समाधान

लांजा (प्रतिनिधी)लोकांच्या मागणीनुसार अखेर सोमवारी २० नोव्हेंबर पासून लांजा नगरपंचायती मार्फत शहरातील भटक्या श्वासांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत सोमवारी शहरात विविध भागात भटक्या कुत्र्यांची धरपकड करण्यात आली.

दरम्यान शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याची मोहीम ही पुढील दहा दिवस चालणार असल्याची माहिती लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला

राणे यांनी दिली.

लांजा शहरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला होता. भटके श्वान हे बाजारपेठेत वर्दळी चे ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुंडीने फिरत होते. या भटक्या श्वानांमुळे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरात बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या भटक्या कुत्र्यांकडून अनेकदा या नागरिकांना चावा घेण्याच्या घटना देखील घडला होत्या. या भटक्या कुत्र्यांचा लांजा साटवली रोड, पोलीस वसाहत, साटवली फाटा ,हायस्कूल, गोंडे सखल रोड, केदारलिग मंदिर पटांगण ,एसटी बस स्थानक, नगरपंचायत कार्यालय परिसर ,श्रीरामपूल, कोर्ल तिठा, दर्गा रोड आदी परिसरात मोठ्या प्रमाणात वावर होता. आणि त्यामुळे या गजबजल्या ठिकाणी छोट्या वाहनांचे देखील यामुळे अनेकदा अपघात घडले होते.

त्यामुळे या भटक्या श्वानांची पैदास वाढू नये यासाठी लांजा नगरपंचायतीने त्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात यावी, अशी मागणी सातत्याने लांजातील नागरिकांतून केली जात होती. त्यानुसार नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये देखील कुत्र्यांची निर्बिजीकरण करण्या बाबत ठराव करण्यात आला होता. त्यानुसार आज सोमवारी २० नोव्हेंबर पासून लांजा शहरातील भटक्या श्वासांची धरपकड मोहीम हाती घेण्यात आली होती. यासाठी नागपूर येथील निर्मिती पीपल्स फॉर ॲनिमल सोसायटी या संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे. आज शहरातील केदारलिंग मंदिर, चव्हाटा मंदिर रोड तसेच लांजा नगरपंचायत, बाजारपेठ आदी परिसरात भटक्या श्वानांची धरपकड करण्यात आली.

या भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे लांजा नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यात येणार आहे दरम्यान या कुत्र्यांच्या धरपकड मोहिमेमुळे लांजा शहरातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.