गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आमदार नितेश राणे

कुर्ला देवी मंदिर परिसराचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून करणार

कुर्ली येथे कुर्लादेवीचा मूर्तीप्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळा संपन्न

वैभववाडी | प्रतिनिधी : कुर्ली गावच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. त्याचबरोबर कुर्लादेवी तीर्थक्षेत्राचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून करणार असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. कुर्ली गावची ग्रामदैवता श्री कुर्लादेवीचा मुर्तिप्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा संपन्न झाला. आमदार नितेश राणे यांनी आज कुर्ला देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने आ. नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. नितेश राणे म्हणाले, गावच्या विकासात सामाजिक कार्यकर्ते दीपक कदम यांचे फार मोठे योगदान आहे. अशा व्यक्तिमत्त्वांच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत. कुर्ली गावचा विकास यापुढेही थांबणार नाही. विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील मी कोणाला रिकाम्या हाताने मागे पाठवलं नाही. आता तर मी सत्तेतील आमदार आहे. त्यामुळे मागेल तेवढा निधी देण्याची जबाबदारी माझी आहे असे सांगितले. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भाजपा पदाधिकारी भालचंद्र साठे, उद्योजक दीपक कदम, सरपंच सौ. पवार, उपसरपंच अंबाजी हुंबे, भाजपा भटक्या विमुक्त जाती जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, दिलीप पाटील व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

श्री कुर्लादेवी देवस्थान उपसमिती व देवस्थान चे मानकरी, बारा पाच यांच्या  वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यानिमित्ताने पार पडले.सोमवारी श्री गणेश पूजन, मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण मुर्तिप्राणप्रतिष्ठापना सोहळा उद्योजक दीपक द.कदम यांच्या हस्ते पार पडला. सकाळी कलश दिंडी, ग्रामदेवतांचे व परिवार देवता आमंत्रण, गणपती पुजन, पुण्याहवाचन, द्वादश कलश पुजन, जलानिवास. महाप्रसाद, रात्रौ रामायणाचार्य प्रा. नाना महाराज कदम (बिड) यांचे सुश्राव्य किर्तन पार पडले.

मंगळवारी मंडप देवतांचे आवाहन, पुजन व मुख्य देवतांचे जलाधिवास, पुष्पाधिवास, फलाधिवास, धान्याधिवास, शय्याधिवास, अग्नी स्थापना तत्वहोम हवन, दुपारी महाप्रसाद, नवतरुण मित्रमंडळ कुर्ली टेंबवाडी यांच्या सौजन्याने रात्रौ बुवा संदिप पुजारे नाडन देवगड व बुवा व्यंकटेश नर उंडील देवगड यांचा डबलबारी भजनांचा जगीं सामना पार पडला. बुधवारी स्थापित देवतांचे पुजन, श्री. गगनगिरी महाराज यांचे शिष्य दिपक महाराज (झांजूचेपाणी, दाजीपुर) यांच्या शुभहस्ते श्री कुर्लादेवी मंदिर कलशारोहण सोहळा, मुर्तिप्राणप्रतिष्ठापना सोहळा, तत्वन्यास पूजा, बलीदान, पुर्णाहूती, दुपारी श्री कुर्लादेवी स्थापित देवीचे पुजन उदयोजक दीपक कदम यांच्या हस्ते पार पडला.