बहिरवली मध्ये घर आगीच्या भक्ष्यस्थानी लाखोंचे नुकसान

खेड (प्रतिनिधी) खेड तालुक्यातील खाडी पट्टा विभागातील बहिरवली नंबर २ मधील अश्रफ अहमद चौगुले यांचे राहते घर वीजेच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले आहे. ही घटना बुधवारी सकाळी १०:३० च्या सुमारास घडली.सुदैवाने या आगीत कोणाला दुखापत झाली नाही

बहिरवली नंबर २ मधील अश्रफ अहमद चौगुले यांच्यावर हृदयरोग शस्त्रक्रिया डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात मंगळवारी, दुपारी झालेली आहे. त्यांची पत्नी व मुलगी हे त्यांच्या सोबत डेरवण, ता.चिपळूण येथे गेले होते. त्यांच्या घराला टाळे लावून ते गेल्याने बुधवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घरातील वीजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली .काही क्षणात संपूर्ण आगीने घराला वेढा घातला . स्थानिक ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केला मात्र तोपर्यंत पूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले

या आगीच्या घटनेची माहिती खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला मिळताच जवानही दाखल झाले होते. परंतू संपूर्ण घर जळाले होते. या घटनेत अश्रफ यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना डेरवण येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले असून गावातील घरही जळून नष्ट झाले आहे. गावकामगार तलाठी हे गावात वास्तव्यास नसल्याने पंचनामा करण्यात आला नाही अशी माहिती ग्रामस्थांनी दिली