दुर्ग मावळा प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे व्याख्यानाचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्यस्तरावत गेली अनेक वर्षे गुणवत्तेचा मानबिंदू ठरलेला तसेच कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या नकाशावर अग्रगण्य असलेला सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता असूनही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत मात्र अजूनही खूप मागे पडला आहे. ही बाब निश्चितच खेदजनक असून आगामी काळात हा जिल्हा अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून नावारूपास येण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच अधिकारी होण्याचे मोठे स्वप्न बाळगा, असे आवाहन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी केले.
दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) शाखा सिंधुदुर्ग यांच्यामार्फत न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल हळदीचे नेरूर येथे ‘एमपीएससी, यूपीएससी तसेच तत्सम स्पर्धा परीक्षा यांची तयारी’ या विषयावर प्रशालेच्या सभागृहात प्रा. रुपेश पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक अरुण म्हाडगूत उपस्थित होते.
यावेळी प्रा. पाटील यांनी दहावी, बारावी व पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणानंतर असलेल्या विविध स्पर्धा परीक्षांबाबत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यादरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या पुस्तकांचे वाचन करावे, नियमित सराव कसा करावा, आपली दैनंदिनी कशी असावी याबाबतही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवंतांची खाण आहे. लेखक, कवी आणि उत्तम कलावंत याच भूमीने दिले, मात्र प्रशासकीय अधिकारी आपण देऊ शकलो नाहीत. हे सर्वात मोठे अलीकडच्या काळातील आपल्यासमोर उभे टाकलेले आव्हान असून हे आव्हान पेलण्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासून स्पर्धा परीक्षांची कास धरावी. आपल्या आई – बाबांनी आपल्याला घडविण्यासाठी अहोरात्र मेहनत केली आहे, त्यांचे कष्ट वाया न जाऊ देता त्याचे उत्तरायी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगावे, त्यासाठी प्रचंड अभ्यासाची तयारी ठेवावी, असेही प्रा. पाटील म्हणाले.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न व अडचणी यांना कसे सामोरे जावे याबाबत प्रश्नोत्तर स्वरूपात व्याख्यानात चर्चा केली. कार्यक्रमासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक तसेच दुर्ग मावळाचे सागर भिसे, प्रवीण सुद यांनी विशेष प्रयत्न केले. सदर कार्यशाळेस सूरज सावंत, शेवाळकर सर व इतर शिक्षक वृंद, गणपत परब, ऋषिकेश कोराणे उपस्थित होते. रितेश परब यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक शंकर कोराणेे यांनी तर आभार गाडगीळ सर यांनी मानले.
Sindhudurg