रत्नागिरी : रत्नागिरीच्या कन्या डॉ. पूर्वप्रभा पाटील यांची यूके मधील रॉयल सोसायटी फॉर पब्लिक हेल्थचे सदस्य म्हणून निवड झाली आहे.
रत्नागिरीतील आरोग्यसेवा आणि समाजसेवेसाठी समर्पित कुटुंबातील डॉ. पूर्वप्रभा पाटील या सूप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. राधारानी पाटील यांच्या कन्या आणि रत्नागिरीतील आम आदमी पक्षाचे अध्यक्ष श्री ज्योतिप्रभा पाटील यांची धाकटी बहीण आहे.रत्नागिरीसाठी आणि डॉ. पूर्वप्रभा पाटील यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा आणि प्रेरणादायी मैलाचा दगड आहे, जे सार्वजनिक आरोग्य आणि आपत्कालीन औषधांच्या क्षेत्रातील त्यांचे व्यापक कार्य आणि प्रभाव प्रतिबिंबित करते.
हवामान परिषद COP27 मधील त्यांचा अलीकडील सहभाग, संयुक्त राष्ट्रांच्या General Assembly मधील त्यांची भूमिका आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 54,000 वैद्यकीय विद्यार्थ्यांसह भारताच्या वैद्यकीय विद्यार्थी संघटनेच्या (Medical Students Association of India MSAI) माजी अध्यक्षा म्हणून त्यांची कारकीर्द, जागतिक आरोग्यविषयक त्यांचा सक्रिय आणि सकारात्मक सहभाग दर्शवतो. रत्नागिरीतील नागरिकांसाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे.
डॉ. पूर्वप्रभा यांच्या जागतिक आरोग्य सुधारण्याच्या वचनबद्धतेमुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांची ओळख निर्माण झाली असून, हल्लीच ते जागतीक आरोग्य संस्थेच्या (World Health Organization) मा.महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांना भेटल्या होत्या, आणि त्यांच्या बरोबर ग्रामीण आरोग्य सुधारणे बाबत चर्चा केली होती. डॉ. पूर्वप्रभा यांची RSPH सोबत नवीन नियुक्ती ही एक प्रेरणादायी बाब असून, सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी याचा उपयोग होणार आहे.











