मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील विविध भागांना पाणी टंचाईचा तडाखा

मंडणगड l प्रतिनिधी : शहारातील सर्वात जुन्या नळपाणी योजनेची जलवाहिनी जँकवेल शेजारीच फुटल्याने शहरातील विविध प्रभागांना पाणी टंचाईची झळ पोहचली आहे. अनेक भागात पाच दिवसात पाणी आलेले नाही. या योजनेच्या माध्यमातून शहरातील बहुतांश प्रभागांना सध्या दर तीन दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो. मात्र जलवाहीनी फुटल्याने नगरपंचायतीने युध्द पातळीवर काम करुनही पाणी पुरवठा सुरळीत होण्यास वेळे गेला आहे. अथक परिश्रमानंतर गुरुवारी सापटेवाडी येथे पाणी सुटल्याची माहीती मिळाली आहे.

नगरपंचायतीशी संबंधीत सर्वच घटक पाणी प्रश्नांवर गंभीर आहेत हे खरे असले तरी तत्कालीन समस्यामुळे नागरीक डिसेंबर महिन्यातच मे महिन्यातील पाणी टंचाईचा अनुभव घेत आहेत. मंडणगड ग्रामपंचायतीच्या काळात 1975 साली निवळी नदीवर जँकवेल खणून कार्यरत करण्यात आलेली जुनी नळपाणी योजना गेली 48 वर्षे कार्यरत आहे. साधारण पाचशे लोकवस्तीच्या उपयोगासाठी कामात आलेल्या या योजनेची व्याप्ती सुरुवातीच्या काळात मंडणगड व भिंगळोली या दोन गावापर्यंत होती पण बदलत्या काळात केवळ मंडणगड शहराची लोकसंख्या पाच हजारांच्या घरात गेली आहे व तीन हजारहुन अधिक लोक या नळपाणी योजनेवर अवलंबुन आहेत. यात सर्वात गंभीर बाब अशी आहे, नळपाणी योजनेची मुख्य जलवाहिनी आजही तिच आहे.

जी योजना सुरु करताना बसविण्यात आली होती. योजना सुरु झाल्यानंतर मधल्या काळात अनेक सत्ताधारी झाले या सर्वांनी शहरासाठी कोट्यावधी रुपयांच्या नळपाणी योजनेची नियोजन केले पण ते आजही कागदवर आहेत. या संदर्भातील अठ्ठेचाळीस वर्षातील सर्व नियोजने शहर वासीयांच्या समस्या सोडवू शकलेली नाहीत.

दररोज पाणी पुरवठ्याची अपेक्षा आजही अपेक्षाच राहीली आहे. नळपाणी योजनेसाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीच्या विनीयोगाचे स्वप्न सत्ताधाऱ्यांनी पाहील्याने जुन्या योजनेत अडचण निर्माण झाली की तात्पुरत्या कामचलावू उपाययोजना केल्या जातात व वेळ मारुन नेली जाते. वास्तवात केवळ कोट्यावधीच्या उड्या मारण्यापेक्षा नियत कालावधीनंतर नळपाणी योजनेची साठवणूक टाकीची क्षमता वाढवणे व मुख्यजलवाहिनी नव्याने टाकणे याकरिता निधी खर्च करुन अस्तीत्वातील योजना अधिक सक्षम करणे गरजेचे होते.

पण त्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. शहरात सध्या पाणी गळतीचे प्रमाण कमी आहे ही बाब सुखदाई असली तरी कमी पावसामुळे संभाव्य पाणी टंचाईचे काळ फेब्रुवारी महिन्यातच सुरु होण्याची भिती आहे. त्यावेळी पाणी पुरवठ्याचा तीन दिवसांचा कालवधी आणखीन वाढणार हे सरळ आहे. या करिता नगरपंचायतीने अत्तापासूनच नियोजन सुरु केले आहे व त्यांची प्रचिती वांरवार होणाऱ्या नियोजन सभांमधून मिळत आहे. पाणी प्रश्नावर मोठमोठ्या योजनांचे उत्तर शोधून केवळ वेळ वाढण्यापेक्षा या समस्येचे सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे.

त्याकरिता आधी समस्येकडे पाहण्याची दृष्टी बदलणे गरजेचे आहे. प्राप्त जलसाठ्यांच्या योग्य पध्दतीने वापर करुन समस्येची तीव्रता कमी करणे, पाणी गळती शंभर टक्के कमी करणे व प्रत्येक प्रभागासाठी लहान लहान नळपाणी योजना कार्यन्वीत करणेही गरजेची वाटते त्या दृष्टीने विचार व कृतीची मात्र प्रतिक्षा आहे.