
कोंडगाव ग्रामस्थ आक्रमक; काम बंद करण्याचा ठेकेदाराला इशारा
साखरपा : सध्या मिऱ्या नागपूर चौपदरीकरण काम वेगात सुरु आहे. त्याचप्रमाणे कोंडगाव मध्ये सुद्धा वेगाने काम सुरु आहे.मात्र ठेकेदार कंपनीने याबाबत स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ यांना याबाबत कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. रस्त्याची होणारी उंची,जोडरस्ते,वाड्याना जाणारे रस्ते, शाळा, हॉस्पिटल यासाठी जाणारे मार्ग याबाबत कोणतीही माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली नाही आहे.यामुळे आक्रमक भूमिका घेत कोंडगाव ग्रामपंचायतीने कंपनीचे काम बंद पडले.
यामुळे कंपनीचे जनरल मॅनेजर कोंडगाव ग्रामपंचायत येथे उपस्थित राहिले होते. यावेळी कोंडगाव मधील शेकडो ग्रामस्थांनी याठिकाणी उपस्थिती दर्शवली होती.यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थांनी आक्रमक होत ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापकावर प्रश्नांचा भडीमार केला.त्याचबरोबर विकास होत असताना सर्वसामान्य नागरिकाला याचा त्रास होऊ नये अशी भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रस्तावित रस्त्याचा कोणताही प्लॅन कंपनीने उपस्थित ग्रामस्थांसमोर मांडला नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीत येणारे मेढे,दळवीवाडी,वाणीवाडी, कोंडगाव तिठा, बाईंगवाडी, शिंदेवाडी, जोयशीवाडी, मुरलीधरआळी, रोहिदासवाडी आदी ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी मार्गाची उपलब्धता आदी विषयक मुद्दे आक्रमक स्वरूपात ग्रामस्थांनी मांडले. त्यांचबरोबर कोंडगाव तिठा याठिकाणी जंक्शन व्हावे की ओव्हरब्रिज व्हावा याबाबत चर्चा करण्यात आली.
बहुसंख्य ग्रामस्थांनी अपघात, ट्राफिक आदी मुद्द्यावर विरोध केला.यानंतर याबाबत स्थानिक खासदार व आमदार यांना पत्र देण्यात येणार असून हायवे अधिकारी, ग्रामस्थ अशी संयुक्त सभा आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी स्थानिक ग्रामस्थांची या विषयाबाबत कमिटी देखील स्थापन करण्यात आली. त्यामुळे हायवे प्रशासन आणि ठेकेदार कंपनी यांच्या मनमानी कारभाराबाबत ग्रामस्थ आक्रमक झाले असून काम बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी ग्रामपंचायत सरपंच प्रियांका जोयशी, उपसरपंच दीप्ती गांधी, सर्व सदस्य,ग्रामस्थ, व्यापारी,पत्रकार, ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.












