आजाराला कंटाळून उत्तर प्रदेश येथील प्रौढाची मिरजोळे एमआयडीसी येथे चालत्या रेल्वेतून उडी घेत आत्महत्या

रत्नागिरी ः प्रतिनिधी: आजाराला कंटाळून उत्तर प्रदेश येथील प्रौढाने चालत्या रेल्वेतून उडी घेत आत्महत्या केली.ही घटना बुधवार 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 3.45 वा.मिरजोळे एमआयडीसी येथील कंचन हॉटलेजवळील रेल्वे रुळावर उघडकीस आली.

राम नरेश राममनोहर (55,मुळ रा.जि.आजमगढ,उत्तरप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे.राम नरेश राममनोहर हा काही कामानिमित्त गोव्याला गेला होता.त्याठिकाणी त्याचा पाय दुखु लागल्याने तेथील डॉक्टरकडे गेला असता त्याच्या पायाला गँगरीन झाल्याचे डॉक्टरांनी सांगून त्याला शस्त्रक्रिया करण्याबाबतची चिठ्ठी दिली होती.दरम्यान,बुधवारी दुपारी तो संपर्क क्रांती एक्सप्रेसने मुंबईला जात असताना त्याने मिरजोळे येथील कंचन हॉटेल येथील रेल्वे रुळावर चालत्या रेल्वेतून उडी घेत आत्महत्या केली.

याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाच पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.पोलिसांना त्याच्या खिशातून गोव्यातील एका डॉक्टरची चिठ्ठी मिळाली.या दुखण्याला कंटाळूनच आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने त्या चिठ्ठीच्या पाठीमागे लिहून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला आहे.