लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुक्याचे सुपुत्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी व सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) संतोष चव्हाण यांचे (वय ४८) शनिवारी रात्रीच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कायद्याचा गाढा अभ्यासक असलेले न्यायाधीश हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
संतोष चव्हाण हे लांजा तालुक्यातील वेरळ गावचे सुपुत्र आहेत. संतोष चव्हाण हे कायद्याचे गाढे अभ्यासक आणि कायद्यावर पकड असलेले न्यायाधीश म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची प्रॅक्टिस लांजा शहरातील ॲड . यशवंत पाटकर या जेष्ठ वकिलांकडून सुरुवात झाली. त्यानंतर सन २००९ मध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर न्यायदान सेवेत आल्यावर काही काळाने त्यांची मालवण येथे दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्त झाली होती .त्यानंतर त्यांना बढती मिळाली व या बढतीनंतर त्यांना अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी व सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
न्यायदान करताना पूर्वीच्या निवड्यांचा संदर्भाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. कायद्याची बारकाई त्यांना माहिती होती .जलद न्यायदानासाठी त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा, दोन भाऊ, बहिणी असा परिवार आहे. त्यांचा निधनाचे वृत्त कळतात त्यांच्या मूळ गावी लांजा तालुक्यातील वेरळ तसेच तालुक्यातून त्याचे मित्र परिवाराकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या गावी म्हणजे वेरळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.











