इन्सुलीत बेकायदा दारूसह १ कोटी १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

कुडाळ एक्साईजची इन्सुली एक्साईज कार्यालयासमोर धडक कारवाई

बांदा l प्रवीण परब :     इन्सुलि उत्पादन शुल्क कार्यालया समोरील महामार्गावर कुडाळ उत्पादन शुल्क विभागाने गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाई तब्बल ८४ लाख रुपयांची दारू व ३० लाख रुपयांचा ट्रक असा एकूण १ कोटी १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी जयंतीलाल सोमाबाई मकवाना (३८) व नटुभाई मोहनभाई राठोड (४५, दोघेही र. राजकोट, गुजरात) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्सुली उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोरच कुडाळ कार्यालयाने कारवाई केल्याने इन्सुली कार्यालयाचा कारभारामधील सुस्तपणा समोर आला आहे.

गोव्यातून सिंधुदुर्गात बेकायदा दारू वाहतूक होणार असल्याची ‘टीप’ कुडाळ उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार आज सकाळी महामार्गावर सापळा रचण्यात आला होता. गोव्यातून मुंबईच्या दिशेने येणारा ट्रक (जीजे २५ यु ४११५) तपासणीसाठी इन्सुली चेकपोस्टवर थांबविण्यात आला. प्रथमदर्शनी केवळ मुरघासच्या गोण्या दिसत होत्या. मात्र अधिक तपासणी केली असता ट्रकमध्ये लपवून ठेवलेले १००० दारूचे बॉक्स आढळून आले.

सदर कारवाई जिल्हा अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ निरीक्षक अमित पाडाळकर, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, राहुल मोरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रमाकांत ठाकूर, संदीप कदम, हेमंत वस्त, प्रशांत परब, विजय राऊळ यांनी केली. पुढील तपास निरीक्षक अमित पाडाळकर करीत आहेत.

इन्सुली एक्साईजचा कारभार कायमच वादातीत राहिला आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे दारूवायक व्यवसायिकांशी असलेले संबंध यामुळे या कार्यालयाकडून अगदी नगण्य कारवाया केल्या जातात. अनेक वेळा या कार्यालयाच्या हद्दीत कुडाळ उत्पादन शुल्क तसेच कोल्हापूर भरारी पथकाकडून कारवाया केल्या जातात.