राजापूर शहरातील दिवटेवाडी स्मशानभूमी ते लक्ष्मी नारायण मंदीर, पीरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट

राजापूर (वार्ताहर): शहरातील दिवटेवाडी स्मशानभूमी ते लक्ष्मी नारायण मंदीर, पीरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असून डांबरीकरणानंतर दुसऱ्याच दिवशी रस्त्यावरील खडी उकटू लागल्याने सदरचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप येथील नागरीकांतून करण्यात येत आहे.

दिवटेवाडी स्मशानभूमी ते लक्ष्मी नारायण मंदीर पासून पीरापर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत करण्यात आले आहे. सदर रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला होता. तीव्र उताराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने या मार्गावरून वाहन चालविणे जिकरीचे बनले होते. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरीकांतून होत होती. दरम्यान रस्त्याचे काम सुरू झाले असून डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावरील खडी वाहनांच्या वर्दळीनंतर उकटू लागली आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप नागरीकांतून करण्यात येत आहे.

दरम्यान याबाबत या परिसरातील नागरीकांनी नगरपरिषदेला निवेदन दिले असून सदर रस्ता टिकाऊ व्हावा या उद्देशाने सदर रस्त्याचे काम सुरु झाल्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंत प्रशासनातील अभियंता यांनी प्रत्यक्ष उभे राहून सदर कामाची पाहणी करावी तसेच रस्त्यासाठी लागणारे मटेरिअल हे शासन प्रमाणित असावे अशी मागणी नागरीकांनी केली आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर रस्ता कमीत कमी 2 वर्ष टिकावा व या कालावधीत नळ संयोजनातील बिघाडामुळे रस्ता खोदाई होऊ नये यासाठी पशासनाकडून संबंधीत नळ धारकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे नळ धारकांनी स्वखर्चाने आपापली नळ कनेक्शन रस्त्याच्या बाहेर काढून घेतली आहेत. त्यामुळे सदर रस्ता कमीत-कमी 2 वर्ष टिकेल याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाने घ्यावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अभियंता यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करुन काम योग्य असल्याबाबतचा दाखला दिल्यावरच संबंधित ठेकेदाराला कामाचा मोबदला अदा करण्यात यावा, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.