सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे खेड तालुक्यातील काम अजून अर्धवट स्थितीत आहे. या कामादरम्यान मार्गावर गावात जाण्यासाठी उभारण्यात आलेले दिशादर्शक फलक कोलमडून पडले आहेत.
या दिशादर्शक फलकांकडे कोणाला लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसत आहे. खेड तालुक्यातील चौपदरीकरण झालेल्या भागात महामार्गावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक उभारण्यात
आले आहेत. महामार्गावरून गावात प्रवेश करण्यासाठी हे फलक उपयुक्त ठरत आहेत.
चौपदरीकरणाच्या कामादरम्यान उभारण्यात आलेले हे फलक जागेवर आहेत किंवा नाहीत, ते
सुस्थितीत आहेत का, याची पाहणी करण्याची तसदीही संबंधित विभागाने घेतलेली दिसत नाही. त्यामुळे महामार्गावरील काही फलक तुटले आहेत तर काही फलक गायब झाले आहेत.
महामार्गावरील खेड येथील अतिरिक्त लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत मोडणाऱ्या गावांपैकी असगणी हे गाव महामार्गावर येते. महामार्गावरून असगणी गावात किंबहुना अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत प्रवेश करण्यासाठीचा उभारण्यात आलेला फलक कित्येक दिवसांपासून वाकलेल्या स्थितीत आहे. मात्र, अद्यापही या वाकलेल्या फलकाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.












