वाशिष्टी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी महोत्सवाचा समारोप!

‘गनिमी कावा’ शिवाजी महाराजांच्या जीवनावरील नृत्य नाटिकेने उपस्थितीतांची मने जिंकली!

चिपळूण : संतोष सावर्डेकर — वाशिष्ठी डेअरीतर्फे भरविण्यात आलेला भव्य कृषी महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास रंगमंचावर जागृत करून गनिमी कावा या नृत्यनाटिकेचे या कृषी महोत्सवाचा समारोप झाला. जय भवानी, जय शिवाजी घोषणा देत या नृत्य नाट्याला प्रतिसाद दिला.

सलग तीन दिवस सावरकर मैदानात हा कृषी महोत्सव रंगला. अखेरच्या दिवशी व्यासपीठावर माजी आ. रमेश कदम, चिपळूण नागरीचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष चव्हाण, संचालिका स्मिता चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, जयंद्रथ खताते, अॅड. नयना पवार, सहकारचे माजी सचिव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सुभाष चव्हाण यांनी, अत्यंत खडतर मेहनतीतून आपण संस्था उभी केली आहे. दररोज पतसंस्था व वाशिष्ठी डेअरी या दोन्हीकडे आपले लक्ष असते. दुग्ध व्यवसाय करण्याचे आपले स्वप्न होते, ते आज सत्यात उतरले आहे. पुढील काळात प्रशांत यादव आणि स्वप्ना यादव यांना अशीच साथ द्या, असे आवाहन केले.

वाशिष्ठीचे चेअरमन प्रशांत यादव म्हणाले, या महोत्सवाला पाच लाखाहून अधिक लोकानी प्रतिसाद दिला आहे. यातून शेतकरी आणि तरूणांनी कृषीपूरक उद्योग आणि रोजगाराचा धडा घ्यावा. पुढच्या वर्षी आणखी मोठ्या दिमाखात कृषी महोत्सव भरविला जाईल. या महोत्सवात देशभरातील पशुधन आणण्याचा प्रयत्न करू. कोकणातील पशुपालन व शेतकऱ्यांनी अन्य भागातील पशुधनाशी स्पर्धा केली पाहिजे. याची तयारी आत्तापासूनच सूरु करू. कृषी क्षेत्रात नाव कमवा आणि पुढे जा, असे आवाहन केले. स्वार्थ नसेल तर कोकणी माणसे नक्कीच पाठीशी उभी राहतात, हे कृषी महोत्सवाच्या निमित्ताने समोर आल्याचे सांगितले.

माजी आ. रमेश कदम म्हणाले, आपण गेली पंचेचाळीस वर्षे चिपळूणच्या राजकारणात आहोत. अनेक राजकीय कार्यक्रम, सांस्कृतीक कार्यक्रम, स्पर्धा आयोजित केल्या. लोक या महोत्सवाला येतील की नाही अशी शंका असताना हा महोत्सव यशस्वी झाला. कोकणातील लोकांनी महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला. तरूणांना शेतीकडे कसे वळविता येईल यासाठी प्रशांत यादव व त्यांच्या टीमने केलेले काम महत्त्वाचे आहे, असे सांगितले. चिपळूण नागरी पतसंस्थेच्या जशा महाराष्ट्रात शाखा झाल्या आहेत तशा वाशिष्ठी डेअरीच्या देखील होतील, तसेच प्रशांत यादव यांचे भविष्य उज्वल आहे, असा विश्वास व्यक्त केला. यानंतर कृषी महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र महाडिक यांनी वाशिष्ठी डेअरीचे कार्य प्रशंसनीय असून तिच्या वैभवात वाढ होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

तत्पूर्वी रविवारी सायंकाळी झालेल्या कॅट शोवला देखील प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी कॅट नी सादर केलेल्या करामतीनी सर्वांचे लक्ष वेधले होते.

यामध्ये जास्त दूध देणारी गाय मोहन होळकर (प्रथम), राकेश पांचाळ व रवींद्र पांचाळ (द्वितीय). सुदृढ गाय स्पर्धेत विजय माटे (प्रथम), किरण कदम, लक्ष्मी व अनंत कोळवणकर यांना विभागतून द्वितीय, केशव जोशी (तृतीय). सुंदर बैल स्पर्धेत संकेत नळकांडे, मंगेश पालशेतकर (प्रथम), योगेश उदेग (द्वितीय), भारत व सुयोग सावंत यांना विभागून तृतीय. सुंदर रेडा स्पर्धेत आशिष सुर्वे प्रथम, रूपेश शिंदे-द्वितीय, रवींद्र तटकरे ड्डू तृतीय. म्हैस वासरू स्पर्धेत आशिष सुर्वे प्रथम, जयेश शिंदे-द्वितीय. गाय-वासरू स्पर्धेत दिलीप माटे – प्रथम, आनंद कोळवणकर द्वितीय, संकेत कदम व इब्राहिम पटाईत यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला.

पाककला स्पर्धेमध्ये वाशिष्ठी डेअरीची २५ उत्पादने वापरून तयार केलेल्या विविध पदार्थांची पाककला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये तिखट विभागात अनुक्रमे साक्षी चव्हाण, तन्वी शिंदे, प्राजक्ता साठे आणि वीणा जाधव. गोड पदार्थमध्ये अनुक्रमे शामल कदम, कविता शिरोळे, रंजना वैद्य आणि जयश्री यादव यांनी यश मिळविले. लकी ड्रॉ मध्ये गुलाब सुर्वे (सायकल), सोहम चितळे (मिक्सर), एकनाथ भोजने (शेगडी), रूद्र गोवळकर (सायकल) ही बक्षिसे देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील नृत्य नाटिकेने उपस्थितीतांची मने जिंकली!

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील गनिमी कावा ही नृत्य नाटिका सादर झाली. या नाटकाला मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा… नरवीर शिवा काशीद’ यांचा प्रसंग पाहून उपस्थित आमच्या अंगावर आले काटे ! शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला आसमंत!, शाहिस्तेखानावरील स्वारी या प्रसंगाने उपस्थितीतांची मने जिंकली. तसेच या गनिमी कावा नाट्यातील ‘शिवराज्याभिषेक सोहोळा’ डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. ही नाटिका पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. या नाटिकेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनपटच उलगडले. यासाठी या नाटिकेच्या कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यानंतर या कृषी महोत्सवाची सांगता झाली. या कृषी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली. तसेच या महोत्सवाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले.