दलवाई हायस्कूलमध्ये उद्यापासून वार्षिक स्नेहसंमेलन

चिपळूण तालुकास्तरीय भूगोल प्रतिकृती प्रदर्शन स्पर्धेचेही आयोजन

चिपळूण (प्रतिनिधी) : मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलवाई हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहोळा नक्षत्र २०२४ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. प्राथमिक विभाग स्नेहसंमेलन तर शनिवार दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. माध्यमिक विभाग स्नेहसंमेलन पार पडणार आहे. मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष, माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चिपळूण नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर दि. १५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता चिपळूण तालुकास्तरीय भूगोल प्रतिकृती प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन स्पर्धेचे उद्घाटन चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी डी. डी. इरनाक यांच्या हस्ते होणार असून संस्थेच्या सल्लागार श्रीम. शमा दलवाई यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी या तिन्ही कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे चेअरमन खलील दलवाई, दलवाई हायस्कूलचे मुख्याध्यापक रोहित जाधव यांनी केले आहे.