आपली पाठ थोपटण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची निव्वळ फसवणूक
सावंतवाडी । प्रतिनिधी : निरवडे येथील शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश दाखवून सेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आपली पाठ थोपटून घेतली आहे. गाव पॅनल मधील तीन सदस्यांसह केवळ एका वाडीतील काही लोकांनी प्रवेश केला मात्र साडे सहाशेचा आकडा हा निव्वळ फुगवण्यात आलेला असून रुपेश राऊळ आपल्याच नेत्यांची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा निरवडेचे माजी सरपंच प्रमोद गावडे यांनी केली. निरवडे येथील भाजप व शिंदे गटातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सेना नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर प्रमोद गावडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.प्रवेश केलेले लोक हे शिवसेनेचेच आहेत. यापूर्वीच ते शिवसेनेत होते.
मात्र, आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांना पुन्हा पक्षात घेऊन तालुकाप्रमुख रुपेश राऊळ हे आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते आपल्या वरिष्ठ नेत्यांची निव्वळ फसवणूक करीत आहेत हे सत्य आहे. आम्ही झालेला पक्ष प्रवेश नाकारत नाही. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात झालेल्या गाव पॅनलच्या माध्यमातून बिनविरोध झालेले दोन व निवडून आलेला एक असे तीन सदस्य वगळता अन्य कोणीही सेनेत गेले नाही. तसेच त्यांच्यासोबत एका वाडीतील लोकांनी पक्ष प्रवेश केला आहे.परंतु तब्बल साडेसहाशे लोकांचा प्रवेश झाला असे भासवून रुपेश राऊळ आपल्याच नेत्यांची दिशाभूल करत आहेत. मात्र, त्याचा कोणताही परिणाम आमच्या पक्षावर किंवा गावाच्या विकासावर होणार नाही. जे गेलेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.