राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची चरित्रे स्फूर्तिदायी- उध्दव तोडकर

सावर्डे विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

चिपळूण (प्रतिनिधी) : सामाजिक आर्थिक परिस्थितीचे योग्य आकलन, परिस्थितीप्रमाणे नेतृत्व करणे, परिस्थितीला आकार देणे, परोपकारी वृत्ती या गुणांच्या आधारावर हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारताना ज्ञान, दूरदर्शीपणा, सैनिक, लढाया, गडकिल्ले या सर्व बाबींची माहिती टिपून शिवाजी महाराजांना घडविण्याचे मोलाचे काम राजमाता जिजाऊ यांनी केले. स्वामी विवेकानंद हे दूरदृष्टीचे भारतीय तत्त्वज्ञ होते. त्यांनी भारतीय संस्कृतीचा जगभर प्रसार केला. तसेच भारतीय समाजापुढे अनेक जिवंत प्रश्नांची त्यांनी यथार्थ चर्चा केली होती. शिक्षण हे त्यांच्या प्रतिभाशाली चिंतनाचे एक मौलिक क्षेत्र होते. माणसातील माणूसपण जागविणारे शिक्षण हवे, असे त्यांचे मत होते त्यांचे लेखन युवाशक्तीला प्रेरणादायी आहे त्याचे वाचन करून देशभक्ती वृद्धिंगत करावी असे मत विद्यालयाचे पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी मांडले.

सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणजेच युवा दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे,उपमुख्याध्यापक विजय चव्हाण व पर्यवेक्षक उध्दव तोडकर यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन केले.सहाय्यक शिक्षक सुखदेव म्हस्के व अमृत कडगावे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा आढावा घेणारे सुबक सचित्र भित्तीपत्रक तयार केले त्याचे उद्घाटन विद्यालयाचे सहा.शिक्षक मनोज कुलकर्णी व सहाय्यक शिक्षिका अमृता घाग यांचे शुभ हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.सुखदेव म्हस्के यांनी राजमाता जिजाऊंचे हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठीचे योगदान व स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांच्यासमोर आपल्या मनोगतातून उभे केले. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला वंदन करताना विद्यालयाचे पर्यवेक्षक उध्दव तोडकर,व भित्तीपत्रकेचे अनावरण करताना सहाय्यक शिक्षिका अमृता घाग व मनोज कुलकर्णी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.