डाॅ.राजेंद्र चव्हाण यांना ‘दिठी समाजभान पुरस्कार’ जाहीर 

सुमिञा भावे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार पुरस्कार 

शिरगाव ( वार्ताहर)लेखिका, दिग्दर्शिका व चित्रपट निर्माती स्व. सुमित्रा भावे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून, देवगड तालुक्यातील शिरगाव येथील बालनाट्य चळवळीचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक डॉ. राजेंद्र चव्हाण यांना या वर्षीचा ‘दिठी समाजभान पुरस्कार’ जाहीर झाला आहे. आपलं कार्यक्षेत्र सांभाळून कला माध्यमात सामाजिक भान जागं ठेवून काही करू पाहणाऱ्यांसाठी हा पुरस्कार आहे. यावर्षी हा पुरस्कार डॉ. राजेंद्र चव्हाण यांना २८ जानेवारी रोजी पुणे येथील ‘द बॉक्स’ या नाट्यगृहात प्राख्यात रंगकर्मी अतुल पेठे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे.

डॉ. राजेंद्र चव्हाण यांना सुरुवातीपासून नाटक कलेची आवड होती त्यासाठी त्यांना शिरगाव येथे पोषक वातावरण दिसले व त्यानी शिरगावातील काही बाल कलाकारांना घेऊन सन १९९० मध्ये ‘तमसो: मा ज्योतीरगमय’ या एकांकिकेची निर्मिती केली व कणकवली येथील कै.वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकांकिका स्पर्धेत हि एकांकिका सादर केली .व त्यास प्रथम क्रमांकासह सर्व बक्षीसे पटकावली होती.तसेच

अभिनयाचीही बक्षिसे मिळाली होती.त्यापासून शिरगाव येथे बालनाट्य चळवळ सुरु केली.

डाॅ.चव्हाण यांनी ‘मित्र’ शिरगाव या सामाजिक संस्था व शिरगाव हायस्कूलच्या सहकार्याने व सहभागाने आजपर्यंत ३९ एकांकिकाची निर्मिती करून विविध स्पर्धेत सादरीकरण केलेले आहे. प्रत्येक एकांकीकांना बक्षीसे मिळालेली आहेत.

यशस्वी दक्ष डॉक्टर म्हणून अनेक वर्षाची कारकीर्द असलेल्या संवेदनशील नाटकांनी आजपर्यंत अमान अत्तार, ओंकार घाडी , सचिन मोंडकर, गौरी चिंदरकर, कैलास शेटे यासारखे बालकलाकार घडविले व त्यांना सुमित्रा भावे यांच्या चित्रपटातून अभिनय करण्याची संधी मिळाली .त्यामुळे शिरगावची एक वेगळी ओळख ही जिल्ह्यापुरती मर्यादीत न रहाता राज्यभरा पर्यंत पोहचलेली आहे.

याच बरोबर त्यांना चिञकलेचीही मोठी आवड आहे.

यापूर्वी डाॅ.चव्हाण यांना २००९ मध्ये विख्यात अभिनेते स्व.श्रीराम लागू यांच्या ‘ रुपवेध’ प्रतिष्ठानच्या वतीने ‘तन्वीर नाट्यकर्मी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते.

डाॅ.राजेंद्र चव्हाण यांना दिठी पुरस्कार रंगकर्मी अतुल पेठे यांच्या हस्ते देण्यात येणार असून यावेळी डाॅ.राजेंद्र चव्हाण निर्मित,लिखित व दिग्दर्शित ‘धरतरी’ आणि ‘आभाळ’ या दोन एकांकिका बालनाट्याचे प्रयोगही सादर केले जाणार आहेत.

‘बाल कलाकारांचे गाव शिरगाव’ अशी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करणा-या डॉ.राजेंद्र चव्हाण यांना मिळालेल्या या ‘दिठी’ पुरस्काराबद्दल शिरगाववासियांकडून अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.