विजयदुर्ग- पालकमंत्री ना. रविंद्रजी चव्हाण यांनी सूचित केल्यानुसार किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या सदस्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान विजयदुर्ग किल्ला विकासासंबंधीच्या अनेक बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या भेटीत प्रामुख्याने दर्या बुरुज, राम बुरुज आणि गणेश बुरुजासह पोखरत आणि ढासळत चाललेल्या तटबंदीच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक भारतीय पुरातत्व विभागाकडे मागणी करून घ्यावे,तेथील परिसराचे सुशोभीकरण करणे,पे अँड पार्क सुविधा निर्माण करणे यासंबंधीच्या विषयांचे निवेदन समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर व पदाधिकारी यांनी मा जिल्हाधिकारी यांना दिले.
जिल्हाधिकारी श्री. तावडे यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सदरच्या विषयांवर तातडीने कार्यवाही करून संबंधित विभागांशी आवश्यक तो पत्रव्यवहार तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी समिती सदस्यांची बैठक घडवून आणली.
मा पालकमंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याच्या सूचना दिनांक 26 जानेवारी रोजी केल्या होत्या,त्यानुसार या उपक्रमाला उचित गती मिळत असल्याबाबत मा पालकमंत्री तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धती बाबत सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी समितीचे उपाध्यक्ष शरद डोंगरे, सचिव बाळा कदम, सदस्य संजय सावंत आणि समिती संस्थापक राजीव परुळेकर उपस्थित होते.












