
मुलुंड येथे माजी विद्यार्थी मेळाव्यात केले प्रतिपादन
अनेक वर्षांनी भेटले माजी विद्यार्थी
संतोष कुळे | चिपळूण: शाळा म्हणजे आपल्याला अक्षय गिरवायला आणि वाचायला शिकवणारी आपली दुसरी आईच आहे. आपल्या जीवनाला आकार देत शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनवणारी शाळा म्हणजे विद्येचे मंदिर आहे. आदर्श विद्या मंदिर चिवेली म्हणजे संस्कार आणि गुणवत्तेचे केंद्रच आहे. या विद्यालयाच्या नावाप्रमाणेच आदर्श विद्यार्थी येथे घडतो असे प्रतिपादन विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे माजी आ. सदानंद चव्हाण यांनी केले.
मुलुंड येथील मराठा मंडळ सभागृहामध्ये आदर्श विद्यामंदिराच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी आ. श्री चव्हाण बोलत होते.
यावेळी विचारमंचकावर संस्थेचे अध्यक्ष राजेश शिर्के, लोकसत्ताचे सहाय्यक संपादक विकास महाडिक, दत्तात्रय झगडे, संस्थेचे सल्लागार रघुनाथ शिर्के, अशोक वनगे, माजी मुख्याध्यपक प्रकाश हरवंदे, शशिकांत कुचेकर नलिनी वैद्य, सुमन वाघुंडे, उद्योजक, दिनेश शिर्के, श्रीराम झगडे आणि सुधीर तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात पुढे बोलताना माजी आ. श्री. चव्हाण म्हणाले की, जेव्हा ग्रामीण भागात सेवा सुविधा नव्हत्या अशा वेळेत चिवेली सारख्या दुर्गम भागामध्ये चिवेली पंचक्रोशी विकास संस्थेच्या वतीने हे आदर्श विद्यामंदिर सुरू केले. या विद्यालयांमध्ये दोनवली, गांग्रई, गोंधळे, बामनोली, वाघिवरे, अशा अनेक गावातून विद्यार्थी येत होते. बदलत्या काळानुसार आता हायस्कूलची संख्या वाढत गेली. त्यामुळे पटसंख्येवर परिणाम होत आहे. पूर्वी पटसंख्या जास्त असल्यामुळे सर्व परिसर विद्यार्थ्यांनी फुलून दिसत असे. त्यावेळी असणारे सर्व शिक्षक म्हणजेच मायेचा व आपुलकीचा झराच होते. फक्त शिक्षण न देता विद्यार्थ्यांच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवत त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले आहे. आपण सुद्धा त्याच आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी असून आमदार पदापर्यंत पोहोचू शकलो. याचे सर्व श्रेय या विद्यालयाला जाते. कारण जे संस्कार आम्हाला या विद्यालयातून मिळाले . जी गुणवत्ता आणि संस्कराची शिदोरी दिली. त्यामुळेच आयुष्यात पुढे जाऊ शकलो. सर्व माजी विद्यार्थ्यानी सुद्धा पुन्हा या विद्यालयाकडे परतून पाहण्याची गरज आहे.
संस्थेला बळ देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी किमान वर्षातून एकदा एकत्र येणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांचा यशाचा आलेख कसा आहे या गोष्टी सुद्धा माजी विद्यार्थ्यांनी पाहणे गरजेचे आहे. आपली बांधिलकी नेहमीच विद्यालयासोबत राहिली पाहिजे. तर निश्चितच आपले ऋणानुबंध घट्ट होतील, असे त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी लोकसत्ताचे सहाय्यक संपादक विकास महाडिक यांनी सुद्धा संस्थेने काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि कशा पद्धतीने वाटचाल व्हायला पाहिजे यावरती परखडपणे भाष्य केले. या कार्यक्रमांमध्ये सर्वांनाच स्व.वाघुंडे शिक्षकांची अनुपस्थिती जाणवली. त्यांच्या आठवणीने सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू वाहू लागले. त्यांच्या पत्नी सुमन वाघुंडे यांनी सुद्धा चिवेली बद्दलच्या आपल्या आठवणी व्यक्त करताना डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
माजी विद्यार्थी मेळावा होण्यासाठी दिनकर शिर्के आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. संस्थेचे प्रमुख कार्यवाह रमेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजनबद्ध शैलीमुळे माजी विद्यार्थी मेळावा यशस्वी पार पडला. संस्थेचे अध्यक्ष राजेश शिर्के यांनी सुद्धा आपल्या अध्यक्ष मनोगतात सर्वांचे कौतुक करत आपण या विद्यालयासाठी आणि विद्यार्थ्यांना चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी नेहमी तत्पर असे सांगितले.
या मेळाव्यात तीन ठराव करण्यात आले. त्यामध्ये पहिला होता माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे, विद्यालयांमध्ये तांत्रिक शिक्षण सुरू करून स्वतःच्या पायावर विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे. असे ठराव करण्यात आले. या कार्यक्रमाला मुंबई, पुणे चिपळूण येथून अनेक माजी विद्यार्थी उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमाला शालेय समितीचे चेअरमन यशवंत शिर्के, व्हा.चेअरमन पत्रकार संतोष कुळे, प्रमुख कार्यवाह रवींद्र शिर्के, मंगेश शिर्के, कृष्णा पडवळ, संतोष शिबे, दिलीप कदम, सुनील कदम, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक संजय चव्हाण सर्व शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन संस्थेचे प्रमुख कार्यवाह रमेश शिर्के यांनी केले.











