प्रा.भाऊसाहेब गोसावी यांना प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : तासगाव, सांगली येथील ‘प्रतिष्ठा फौडेशन’च्या वतीने प्रा.भाऊसाहेब गोसावी यांना प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. प्रतिष्ठित साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे , सांगलीच्या कवयत्री व लेखिका सौ जयश्री पाटील तसेच प्रतिष्ठा फाऊंडेशनचे अध्यक्ष, मा. तानाजीराजे जाधव यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, गौरवपत्र देवून यथोचित सत्कार करण्यात आला.

प्रा. भाऊसाहेब गोसावी हे सिंधुदुर्ग सावंतवाडी, कारिवडे येथील कवी, लेखक असून ते मालवणी लेखक म्हणून लोकप्रिय आहेत. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत मराठी विषयाचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून तेहतीस वर्ष सेवा करून सध्या ते सेवानिवृत्त आहेत.

मालवणी बोलीतील साहित्य लेखन करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. मालवणी लेखनाबरोबर त्यांचे समीक्षा व संशोधनपर साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांनी कथा , कविता, नाटक व चित्रपट गीतलेखन केले आहे. मालवणी मुलुखातील कविता, भूक, तोफा आणि सलामी हे त्यांचे कवितासंग्रह. माणुसकिच्या हाकेवरचा गाव या मालवणी कथासंग्रहास अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.

धरणाखालचं गाव, जागवा मनाचा जागर यासारखे नाट्यलेखन त्यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी स्त्री लोकगीते हा लोकसाहित्य संशोधनाचा पुरस्कार प्राप्त ग्रंथ त्यांनी लिहिला. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ, दक्षिण मराठी साहित्य परिषद, साहित्य कलायात्री, राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार, मंगळवेढा येथील सप्तर्षी शब्दशिवार काशिबाई घुले पुरस्कार, औदुंबर येथील सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. कोल्हापूर येथील विवेकानंद शिक्षण संस्थेने त्यांच्या शिक्षण सेवा कार्यासाठी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

सिंधुदुर्गचे मालवणी लेखक म्हणून प्रा. गोसावी यांचे लेखन कार्य उल्लेखनीय असेच आहे.