चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये दि. ३ फेब्रुवारी रोजी इयत्ता १० वी च्या पहिल्या तीन बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात प.ए. सोसायटीचे खजिनदार आणि प्रशालेचे शाळा समिती अध्यक्ष विजयकुमार ओसवाल तसेच प्रशालेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक केदार शेंडे, उपमुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे, पर्यवेक्षिका सौ. रश्मी पाध्ये, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. साक्षी गोरीवले, पर्यवेक्षिका श्रीमती मंजुषा चिटणीस, पूर्व प्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख सौ. पूजा तांबट यांचे हस्ते रोपवाटिकेला जलार्पण करून करण्यात आली. प्रशालेमध्ये आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वपरिचय करून दिला काही विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या गोड आठवणी सांगितल्या.
प्रशालेच्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. केदार शेंडे, उपमुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे, कनिष्ठ विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ. शैलजा देवरुखकर आणि प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती मंजुषा चिटणीस आदि सर्वांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपले मनोगत व्यक्त करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे शाळा समिती अध्यक्ष श्री. विजयकुमार ओसवाल यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या वर्षात प्रशालेच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन प्रशालेला सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच प्रशालेला अगत्य पूर्वक भेट दिल्याबद्दल त्यांचे तोंड भरून कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सौ. शितल गावडे यांनी मानले. अशा प्रकारे हा विद्यार्थी मेळावा प्रशालेचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सहकार्याने उत्तमरीत्या पार पडला आणि या कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन करण्यात आली.











