तळवडे येथे भर दुपारी शॉर्ट सर्कीटने आग

 

ग्रामस्थांच्या प्रसंगावधाने अनर्थ टळला

राजापूर (वार्ताहर) :तालुक्यातील तळवडे राववाडी येथे बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने दोन घरे वाचविण्यात यश आले आहे. विज उपकरणात शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे ग्रामथांचे म्हणणे आहे.

बुधवार आठवडा बाजार असल्याने घरी कोणीच नव्हते. सुरेश गुडेकर यांच्या घराशेजारीच सदरची घटना घडल्याने त्यांनी तत्काळ सर्व ग्रामस्थांना एकत्रित करून ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अन्यथा दोन घरे आगीत भस्मसात झाली असती.

या आगीत सदाशिव कलमस्टे यांच्या काजू कलमांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जळाऊ लाकडाचा ढीग जळून खाक झाला. या घटनेची माहिती महावितरण पाचल कार्यालयाला देण्यात येताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी येऊन पहाणी केली. आग विझविण्यासाठी काशीराम सिताराम कलमस्टे, सुरेश बने, तानाजी गोसावी यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहकार्य केले.