राज्यस्तर गुणवंत पुरस्काराने प्रबोध चव्हाण सन्मानित

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे जैतापूर येथील सद्या धामणदिवी जि. प. शाळा नं. १ येथे कार्यरत असलेले प्रबोध जनार्दन चव्हाण यांना कोल्हापूर आविष्कार सोशल अॅण्ड एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला. गणपतीपुळे रत्नागिरी येथे हा सोहोळा नुकताच पार पडला.
प्रबोध चव्हाण यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्रबोध चव्हाण यांच्या घरचे वातावरण शैक्षणिक असून त्यांचे मोठे बंधू इंडियन नेव्ही, एक बंधू भारतीय सैन्यात, एक बंधू इलेक्ट्रिशियन आहेत. या वडील बंधूचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यामुळे त्यांनी डी.एड. केले व शिक्षण सेवक पदावर सुरूवातीस न्यू इंग्लिश स्कूल ओंबळी, ता. पोलादपूर येथे रुजू झाले. नंतर २००३मध्ये जिल्हा परिषद शाळा वडगांव खुर्द येथे रुजू झाले. २००५/०६ला जिल्हा परिषद रत्नागिरीचा वडगांव खुर्द शाळेस आदर्श शाळा पुरस्कार मिळाला.
तसेच प्रबोध चव्हाण  स्पोकन इंग्लिश तसेच वेगवेगळ्या प्रशिक्षणामधे तालुकास्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी तसेच रायगड येथे प्रतिनियुक्ती मुलाखतीसाठी त्यांची निवड झाली होती, परंतु कौटुंबिक अडचणीमुळे त्यांनी जाण्याचे नाकारले. २०१४मध्ये समता कलामंच संगमेश्वर या संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय विश्वसमता पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.