संगमेश्वर : मौजे. मेढे तर्फे फुणगुस, ता. संगमेश्वर जि.रत्नागिरी येथे बुधवारी दि.१४/०२/२०२४ रोजी सकाळी ०७.३० वाजणेच्या सुमारास श्री. सुभाष दत्ताराम देसाई यांचे घराच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्या असल्याचे माहिती श्री. दिपक सावंत पोलिस पाटील, यांनी वनपाल संगमेश्वर दिली. वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता घरा जवळच्या विहिरींमध्ये पडला असल्याचे दिसून आले. बिबट्या हा भक्षाचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असल्याचे दिसून येते.
सदर विहीर ही लोकवस्तीत श्री दिपक सावंत यांच्या घराच्या समोरील असून ती १० फूट व्यास ३ फुट उंच कटडा २५ फूट खोल असून सदरची विहिर पूर्णपणे दगडी बांधकाम केलेली आहे. विहिरीमध्ये दोन ते अडीच फुट पाणी असुन त्यामध्ये बिबटया खाली दगडाचा आधार घेऊन बसलेला दिसला. सदर विहीरीमध्ये पिंजरा दोरीच्या सहाय्याने ग्रामस्थांच्या मदतीने विहीरीमध्ये सोडल्यानंतर दोन ते तीन मिनिटांमध्ये बिबट्याला सुस्थितीत पिंजऱ्यामध्ये घेण्यात आले.
विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढल्यानंतर पशूवैद्यकीय अधिकारी देवरुख श्री. आनंदराव कदम यांनी पाहणी केली असता सदरचा बिबट्या हा साधारणपणे ३ वर्षाचा असून तो नर असून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे करिता सुस्थितीत असलेची खात्री झाल्याने वन विभागाचे बचाव पथकाने सदर बिबट्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
वन विभागाचे बचाव पथकामध्ये श्री. प्रकाश सुतार वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी, श्री. तैफीक मुल्ला वनपाल संगमेश्वर (देवरुख), वनरक्षक, श्री. संजय कराडे, श्री. अकाश कडूकर, श्री अरुण माळी व रेस्क्यू बचाव पथकामध्ये श्री दिलीप गुरव, निलेश मोहिरे, मिथील वाचासिध्द, पोलीस पाटील श्री दिलीप सावंत, सरपंच श्री जयंत देसाई यांनी सक्रिय कामकाज करत बिबट्याला स्थानिक व ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. सदर बचाव पथकास मा. विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्री. दिपक खाडे, व मा. सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) श्री. वैभव बोराटे, यांचे मार्गदर्शन लाभले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र.१९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.












