ज्ञानेश्वरी : महागुरू नि महानाट्य

– प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

ज्ञानेश्वरी – एक अद्भुत लेणं! सातशे वर्ष मोहिनी घालून असलेली ही ज्ञानेश्वरी आजही घराघरांत वाचली जाते. का? सर्वप्रथम ती जगण्याला दिशा देते, मनातला मळ काढते, जीवनाला बळ देते. रणांगणावर आपल्या नातेवाइकांना पाहून कसे लढू, असे म्हणून शस्त्र टाकणारा अर्जुन! त्या अर्जुनाला सारथी झालेले श्रीकृष्ण भगवान उपदेश करतात. आजच्या भाषेत समुपदेशन (काऊन्सिलिंग) करतात. कधी गोड शब्दांत तर वेळप्रसंगी तिखट बोलून. ती भगवद्गीता होय. त्याचे विवरण करताना उदाहरणं देऊन, ज्ञानदेव ती इतक्या प्रभावी पद्धतीने मांडतात की, वाचकांचंही मन सुदृढ होतं. कळत नकळत त्यांच्या मनावर संस्कार होतो.

आजच्या युगात भोवताली रणांगण दिसतं; आपण अर्जुन होतो नि मग ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याला उपदेशाचे हे घोट अमृतवाणीने ऐकायला मिळतात. त्याचवेळी साहित्यकृती म्हणून ती इतकी सौंदर्यपूर्ण आहे की, त्यातून कवी, लेखक, नाटककार यांना धडा मिळतो. संवादलेखनाची ही जणू जनार्थ श्री ज्ञानेश्वरी कार्यशाळा आहे. धृतराष्ट्र-संजय व विशेषकरून श्रीकृष्ण-अर्जुन संवाद विशेषच आहेत. यातील अर्जुन प्रश्न विचारतो, प्रेम प्रकट करतो, भक्ती करतो, कधी रुसतो, सलगी करतो तर श्रीकृष्णही लडिवाळपणे बोलतात; कधी रागावत शिकवतात. हे सारं मुळातून वाचण्याजोगं आहे. काव्य म्हणून हा ग्रंथ त्यांचाच शब्द वापरून काव्याचा रावो ‘काव्याचा राजा’ म्हणावा असा आहे. त्यातील शब्दलावण्य अर्थपूर्ण, अप्रतिम दृष्टान्त, मालिका यातून वाचकांतील कविमनाला काव्यलेखनाचा वस्तुपाठ मिळतो. ज्ञानदेवांची प्रतिभा इतकी महान की हे सारं कथानक नाट्यमय पद्धतीने आपण मनातल्या रंगमंचावर पाहू लागतो. कथा पुढे सरकू लागते, तसे आपण त्यात, गुंतून, गुंगून राहतो. प्रत्येक अध्याय संपताना वाचकाला पुढील अध्यायाविषयी उत्सुकता लागून राहते. जशी एखादी दूरचित्रवाणी मालिका पाहताना उत्कंठा असते तशी! मग सुरू करूया आपला प्रवास ज्ञानदेवांचं बोट पकडून ‘ज्ञानेश्वरी’ सोबत..!

manisharaorane196@gmail.com