‘नरेंद्र’ डोंगराला वणवा : झाडांसह पशुपक्षी आगीच्या भक्ष्यस्थानी

Google search engine
Google search engine

आग विझविण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न

नगरपालिकेचा फायर फायटर अडकला पायथ्याशीच

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहराच्या पश्चिमेस असलेल्या ऐतिहासिक नरेंद्र डोंगराला सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यानंतर वाढत्या उष्म्यामुळे पेटलेला वणवा वाढतच गेला व आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग खालच्या बाजूला मनुष्यवस्तीपर्यंत पोहोचू लागल्याने दक्ष नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. पालिकेचा नवा फायर फायटर जंगल पायथ्याशीच अडकल्याने उपस्थित नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास नरेंद्र डोंगरावर ही आग लागली. सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांच्यासह काही दक्ष नागरिकांना शहरातून डोंगरात आगीचे लोट उठताना दिसताच त्यांनी नरेंद्र डोंगरावर धाव घेतली. ही आग हनुमान मंदीरापर्यंत आल्यानं प्रशासनाला फोनाफोनी करत याची कल्पना दिली. परंतु, बराचवेळ प्रशासनाकडून दखल न घेतली गेल्यान आपत्कालीन ११२ नंबर ला फोन करत घटनेची कल्पना दिली. त्यानंतर वनविभाग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. वाढत्या उष्म्यामुळे वणवा पेटून ही आग लागल्याचं वनविभागाकडून सांगितले गेल. तब्बल पाच तास हा वणवा विझविण्यासाठी वनविभागाकडून शर्थिचे प्रयत्न सुरू होते.

मळगाव वनपाल प्रमोद राणे, वनपाल सदानंद कदम, वनरक्षक प्रकाश रानगिरे यांनी अथक परिश्रम घेतले. परंतु, आग आटोक्यात येत नसल्यानं उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांसह वनरक्षक वसंत गेजगे, वनरक्षक नेमळे, रमेश पाटील, वनमजूर अशोक गावडे, रामचंद्र रेडकर, तुषार सावंत आदी वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत डोंगराला लागलेली आग आटोक्यात आणली.

दरम्यान, पोलिस सतिश देसाई, मनिष शिंदे नगरपरिषदेचा ‘फायर फायटर’ बंब घेऊन दाखल झाले. मात्र, हा बंब डोंगराच्या पायथ्यालाच अडकला. रस्त्यातील वायरींचा अडथळ्यामुळे बंब वर चढणार नसल्याच फायर ब्रिगेडकडून सांगितले गेलं. हनुमान मंदीरापर्यंत आग पोहचली असल्यानं व मंदीरापासून १०० मीटर अंतरावर लोकवस्ती असल्यानं या आगीचा फटका लोकवस्तीस बसण्याची दाट शक्यता होती. त्यात रात्रीची वेळ असल्यानं परिसरातील नागरिकही बेसावध होते‌.

याप्रसंगी मंदीर परिसरातील आग वाढू नये यासाठी न.प. प्रशासनाने प्रयत्न करणं आवश्यक असताना बंब पायथ्यालाच अडकल्यानं तो बिनकामाचा ठरला. नुकताच ५५ लाख खर्च करून हा फायर फायटर खरेदी करण्यात आला आहे. परंतु, अडचणींमुळे हनुमंत मंदीरापर्यंत तो न पोहचल्यानं उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. सुदैवानं वणवा अधीक न परसल्यान अनर्थ टळला. आजूबाजूच्या लोकांना पोलिसांनी घटनेची माहिती देत सावध राहण्याची सुचना केली.

या वणव्यात जंगलातील झाडांसह नरेंद्र डोंगरावरील बराचसा भाग जळून खाक झाला. या ठिकाणच्या झाडांसह प्राणी, पक्षांना या आगीमुळे मोठ्या नुकसान पोहोचलं आहे. वाढत्या उष्म्यामुळे वणवा पेटून ही आग लागल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं. डोंगरावरी रस्त्यावर स्वच्छता राखल्याने हा वणवा दुतर्फा पोहचला नाही.

दरम्यान, भविष्यात अशा घटना घडल्यास आग विझवण्यासाठी वनविभागान सक्षम पर्याय उभा करावा. लोकवस्तीसह जंगली प्राण्यांनाही त्याचा फटका बसणार नाही यासाठी वनविभागाकडून स्वतंत्र यंत्रणा तत्पर ठेवण्यात यावी अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली आहे. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अर्चित पोकळे, साईश निर्गुण, शुभम बिद्रे, गौतम माठेकर, संदिप निवळे, प्रथमेश प्रभू, बबलू मिशाळ, रेगिन फर्नांडिस, धनंजय डिचोलकर, गौरव म्हापसेकर आदी उपस्थित होते.

Sindhudurg