कितीही विघ्न आणली तरी थांबणार नाही; चिपळूण नागरीचे कार्य अविरत सुरू ठेवणार

सहकार मेळाव्यात अध्यक्ष सुभाषराव चव्हाण गरजले

सभासद व समन्वयकांनी आम्ही संस्थेच्या पाठीशी असल्याचा दिला विश्वास!

चिपळूण (प्रतिनिधी):’चिपळूण नागरी’च्या बाबतीत काही विघ्नसंतोषी चुकीचे पाऊल उचलत आहेत. पण त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही कितीही विघ्न आणा, अडथळे निर्माण करा. मी आणि माझी संस्था थांबणार नाही. संस्थेचे कार्य अविरत सुरू ठेवणार, अशा शब्दांत चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण गरजले, तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना उत्स्फूर्तपणे दाद दिली.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा सहकार मेळावा रविवारी संस्थेच्या सहकार भवन येथे उत्साहात झाला. यावेळी प्रास्ताविक करताना श्री. “चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी
संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. सभासदांच्या प्रमाणिकपणामुळे कर्ज परतफेड उत्तमपणे सुरू आहे. अजूनपर्यंत ८० हजार सभासदांना संस्थेमार्फत कर्ज वाटप करण्यात आले आहे. काही अपवाद सोडले तर कर्जवसुली त्याच ताकदीने केलेली आहे. आपण स्वतः वसुलीसंदर्भात कर्मचाऱ्यांशी संवाद असतो. कुठे अडचण आली तर थेट माझ्याशी संपर्क करा असेही सांगितले आहे. याच कार्यपद्धतीमुळे संस्थेची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे, असे आवर्जून नमूद केले.

मात्र, यावेळी श्री. चव्हाण यांनी संस्थेच्या विरोधात ‘काड्या’ करणाऱ्यांचाही समाचार घेतला. संस्थेची होणारी बदनामी सहनशक्तीपलीकडची आहे. यामुळे नक्कीच अस्वस्थ झालो आहे. कारण आमची संस्था जनहितासाठी कार्य करते. सर्वसामान्य घटकांसाठी झटत आहे. परंतु महाराष्ट्रमध्ये नावलौकिक झालेल्या संस्थेची प्रगती काहीजणांना बघवत नाही. म्हणूनच त्यांच्याकडून नाहक त्रास सुरू आहे. पण त्या सर्वांना माझे एकच सांगणे आहे. तुम्ही कितीही आडकाठी आणली तरी मी बधणार किंवा थांबणार नाही. ‘चिपळूण नागरी’ची वाटचाल अशीच सुरू राहील. विघ्नसंतोषी मंडळीचे मनसुबे कधीच सफल होणार नाहीत, अशा शब्दांत श्री. चव्हाण यांनी विरोधकांना फटकारले.

तसेच यावेळी सुभाषराव चव्हाण आगामी पंचवार्षिक २०२८ चा संकल्पित आराखड्याची घोषणा केली. चिपळूण नागरी सर्वसामान्यांसाठी काम करीत असताना वाशिष्ठीच्या माध्यमातून आपल्या कोकणातील शेतकऱ्यांना एक प्रभावी माध्यम निर्माण झाले आहे. प्रभावी माध्यम निर्माण झाले असून या उद्योगाच्या माध्यमातून असंख्य शेतकरी दुग्ध व्यवसायात उतरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आपल्याला खात्री आहे की, पाच हजार तरी तरुण- शेतकरी वर्षभरात या प्रकल्पाशी जोडले जातील आणि समृद्ध होतील, असा विश्वास सुभाषराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

तर ते आणखी पुढे म्हणाले की, सहकारातून देशाच्या आर्थिक विकासात फार मोठे काम होऊ शकतं. चळवळ अधिक गतिमान आणि ताकदवान निर्माण झाल्यास भविष्यकाळात आपल्या देशातील सर्वसामान्य गरिबांना त्याचा लाभ होईल. पर्यायाने तरुणांना रोजगार देणे हे या सहकारी चळवळीचे महत्वाचे काम आहे, असे सुभाषराव चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सभासद, कर्जदार, अधिकारी व कर्मचारी यांचे होत असलेल्या सहकार्याबद्दल कौतुक केले.

यावेळी संचालक रवींद्र भोसले, कदत्तात्रय लिंगायत, अविनाश आंब्रे, रामदास राणे, पत्रकार सतीश कदम, ९३ वर्षीय मामा जाधव यांनी आपल्या मनोगतातून आम्ही संस्थेच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही दिली. साहेब, काळजी करू नका, असा या सर्वांनी विश्वास दिला.

यावेळी सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस. बी. पाटील यांनी सहकार चळवळीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी माजी व्हॉइस चेअरमन विद्यमान संचालक सूर्यकांत खेतले, अशोकराव कदम, गुलाब सुर्वे, राजेश वाजे, रवींद्र पटवर्धन सत्यवान मामुनकर, सोमा गुडेकर, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, एडवोकेट नयना पवार, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आदी उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन व्हाईस चेअरमन अशोक साबळे यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.