मुंबई गोवा महामार्गावर ट्रकला धडकून कारचा अपघात

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर जानवली गावठाणवाडी येथे पुढे जाणाऱ्या ट्रकला धडकून कार अपघातग्रस्त झाली. सकाळी नऊच्यासुमारास ही घटना घडली. यात कार मधील गिर्ये गावातील दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

असरोंडी येथून चिरे वाहतूक करणारा ट्रक ( एमएच ०९ एल ०६३७ ) हा फोंडाघाट येथे जात होता. तर सुझुकी कंपनीची कार ( एमएच – ०५ – ईक्यू- ४७६१ ) कणकवली ते देवगड होती. जानवली गावठाणवाडी येथे कार चालकाने ट्रकला ओव्हरटेक

करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार ट्रकच्या पुढील बंपरला घासली. त्यानंतर पुढे जाऊन दुभाजकावर आदळून दोन, तीन पलटी मारून महामार्गावर थांबली. या अपघातामध्ये कारमधील चालक परशूराम प्रभाकर घाडी आणि प्रकाश परशूराम घाडी (वय ५६, दोन्ही रा.गिर्ये, ता. देवगड) हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर जखमींना कणकवलीतील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. या अपघातानंतर ट्रक चालक महेश भरत वाळवे (वय ४५, रा. तिवरे, कणकवली) याने कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली असून या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.