ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात!
कुणबी एकता प्रतिष्ठानचे मा.तहसीलदार,गुहागर यांना निवेदन.
पालशेत | वार्ता : गुहागर तालुक्यातील आवरे – खोपटी – भातगाव – कोळवली – कोसंबी पुल रस्त्याची भयानक दुर्दशा झाली असून लोक जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करत आहेत.हा रस्ता मे २०२३ पर्यंत दुरुस्त न झाल्यास येथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.सदर रस्ता दुरुस्तीबाबत विशेष लक्ष घालण्याची मा.तहसीलदार,गुहागर यांना कुणबी एकता प्रतिष्ठान,भात गावच्या वतीने निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे.
गेली अनेक वर्षे हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला असून वारंवार मागणी करूनही या रस्त्याचे डांबरीकरण केले जात नाही.या भागातील अनेक गावांना जोडणारा हा रस्ता असून दशक्रोशितील ग्रामस्थांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.सदरची बाब संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देखील या भागातील लोकांच्या रास्त मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.कुणबी एकता प्रतिष्ठान, भातगावच्यावतीने याबाबत पंचायत समिती,गुहागरच्या गटविकास अधिकाऱ्यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.या मार्गावरील अनेक गावांमधील ग्रामस्थांना, वाहनचालक,विद्यार्थी,गरोदर महिला,वृध्द,रुग्ण यांना या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.ही बाब या निवेदनामध्ये निदर्शनास आणून देण्यात आली आहे.सदर रस्ता हा पूर्णतः उखडला असून अपघातांना आमंत्रण ठरत आहे.संबंधित विभाग या मार्गावर रस्त्याच्या दुरावस्थेचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का?असा संतप्त सवाल माध्यमांशी बोलताना येथील ग्रामस्थांनी केला आहे.
सध्या सणासुदीचा काळ आहे.शिमगा आणि पालखी उत्सव सध्या कोकणात सर्वत्र उत्साहात सुरू आहे.प्रत्येक गावात ग्रामदेवतेच्या पालख्या घरोघरी अनवाणी नेल्या जातात.आवरे गावापासून कोसंबी पुलापर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने ग्रामस्थांना ग्रामदेवतेच्या पालख्या घरी नेताना असह्य त्रास सहन करावा लागत आहे.निवडणुकीच्या काळात मतांचा जोगवा सर्वसामान्य लोकांच्या घरोघरी जाऊन मागणाऱ्या पुढाऱ्यांना आता लोकांच्या समस्या सोडवायला वेळ नाही.ग्रामस्थांनी सगळ्या प्रकारचे सर्व प्रयत्न केले मात्र पदरी निराशाच आली.मात्र आता आमच्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन या रस्त्याचे डांबरीकरण माहे मे २०२३ पर्यंत पूर्ण न झाल्यास कुणबी एकता प्रतिष्ठान,भातगाव ग्रामस्थांसह उग्र आंदोलन करणारच असा इशारा देण्यात आला आहे.