जामगेत कॅ. मनोज कदम यांच्या स्मारकाचे अनावरण

 

 

खेड (प्रतिनिधी)तालुक्यातील जामगे गावचे सुपुत्र व सैन्य दलात सेवा बजावत एका सहकाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात प्राण गमावणाऱ्या कॅडेड कॅप्टन मनोज अंबाजी कदम यांच्या स्मारकाचे अनावरण शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत झाले.

 

रत्नागिरी एनसीसी कॅम्पचे प्रमुख ऑफिसर कॅप्टन मनोज कदम १२ सप्टेंबर २००० रोजी दोन मित्रांना समुद्रात बुडताना पाहून स्वतःच्या जीवाची परवा न करता त्यांच्या मदतीला धावले होते. त्यापैकी एका मित्राला वाचवण्यात यश आले होते. तर दुसऱ्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना प्राण गमावावे लागले होते.

 

 

या साहसातून सर्वांनी प्रेरणा घेण्यासाठी शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्या पुढाकारातून त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकाच्या अनावरणप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, उद्योजक शैलेश कदम व पदाधिकारी उपस्थित होते.