राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एन एस एस चे निवासी शिबीर उत्साहात संपन्न

 

आंबव येथील प्र.शि.प्र.संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी शिबीर उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांना ग्रामस्वच्छता, समाजसेवा, श्रमदान, बौद्धिक विकास यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या हेतूने या शिबिराचे प्रामुख्याने आयोजन करण्यात येते. हे एक आठवड्याचे शिबीर नजीकच्या निवे गावी आठवडाभर घेण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रवींद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी एन एस एस चे उद्दिष्ट लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीसाठी झटावे तसेच यातून सर्वांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी असा त्यांनी संदेश उद्घाटन कार्यक्रमावेळी दिला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. महेश भागवत, कार्यक्रम अधिकारी डॉ. अच्युत राउत, निवे गावच्या सरपंच कल्याणी जोशी, उपसरपंच अमोल जाधव तसेच सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.

शिबिराच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात पहाटे योगा, प्राणायाम, शारीरिक व्यायाम व ईश्वर आराधनेने करण्यात येत होती. नियोजनानुसार दरदिवशी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी गावातील शिंदे वाडी येथे बंधारा बांधला तसेच काही ग्रामस्थांच्या घरी शोषखड्डे खणून दिले. निवे गावची ग्रामदेवता वरदानदेवीचा मंदिर परिसर, तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसर, सहाण, बस थांबा यांची स्वच्छता केली. तसेच निवे गावातील रस्ते स्वच्छ केले. गावक-यांमध्ये अंधश्रद्धा, स्वच्छ्ता, मुलामुलींमधील भेदभाव, पर्यावरण रक्षण याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पथनाट्या सदर केले. गावातील आश्रमशाळेला भेट देऊन तेथील कामकाज समजून घेतले.

शिबिरादरम्यान विविध विषयांवर बौद्धिक व्याख्याने आयोजित करण्यात आली. यामध्ये ‘आरोग्य’ या विषयावर परिचारिका प्रियांका कुवळेकर व तृप्ती विभूते, ‘अमेरिकेच्या किमानता या संकल्पनेचे भारतीय संस्कृती व परंपरेवरील प्रतीबिंब’ या विषयावर प्रा. दिवाकर पाटणकर, ‘व्यसन आणि वैयक्तिक स्वच्छ्ता’ या विषयावर डॉ. संदेश पवार, ‘आजच्या तरुणांच्या सामाजिक जबाबदाऱ्या’ या विषयावर प्रा. मोहन गोसावी तसेच ‘योग व ताण तणाव व्यवस्थापन’ या विषयावर डॉ. महेश भागवत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

शिबिराच्या सागंता समारंभाला एन एस एस चे जिल्हा समन्वयक प्रा. राहुल मराठे उपस्थित होते. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना विस्तृतपणे मार्गदर्शन करताना एन एस एस चा मुळ उद्देश स्पष्ट करून त्यांना आपल्या भविष्यातील जबाबदा-यांची जाणीव करून दिली.

कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. अच्युत राउत यांनी केले. तर शिबीर यशस्वितेसाठी सहकारी प्राध्यापक कादंबरी बागायतकर, शूभांगी कांबळे, बिंदिया मोहिते, समृद्धी वाझे आणि ‘रासेयो’ चे स्वयंसेवक विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.