पालखी घरात आल्यानंतर फटाके लावल्याच्या वादातुन सख्ख्या भावांच्या कुटुंबात हाणामारी , गुन्हा दाखल

राजापूर l प्रतिनिधी :राजापूर तालुक्यातील केळवली निखरे येथे शिमगोत्सवा निमित्त पालखी घरात आल्यानंतर फटाके लावल्यावरून झालेल्या वादातून दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबामध्ये हाणामारी झाली असून या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली. सोमवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही गटातील आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलास खाडये, विकास खाडये व रघुनाथ खाडये हे सख्खे भाऊ असून एकमेकांशेजारी राहतात. मात्र त्यांच्यामध्ये मागील पाच वर्षांपासून वाद आहेत. अशातच सोमवार दि.1 मार्च रोजी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास विकास यांच्या घरी पालखी आल्याने त्यांनी घराच्या पुढील भागात फटाके वाजवले. या फटाक्यांचा कचरा विलास यांच्या अंगणात आला. दरम्यान शेजारी राहणारा भावेश खाडये हा विकास यांच्या अंगणातील फटाक्याच्या कागदाचे तुकडे झाडत होता. त्यावेळी विलास यांना आमच्या अंगणातील कागदाचे तुकडे सुध्दा झाड असे सांगितले.

याचा राग आल्याने विकास याने त्याच्या हातातील लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्या पाठोपाठ विकास याची पत्नी उदया यांच्यासह रघुनाथ  खाडये, विक्रांत विकास खाडये व उज्ज्वल खाडये यांनी देखील शिविगाळी करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मला सोडविण्याकरीता आलेला माझा मुलगा  व सुन यांनाही मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी विकास खाडये, उदया खाडये, रघुनाथ खाडये, विक्रांत खाडये व उज्ज्वल खाडये (राह.केळवली निखरेवाडी) यांच्या विरोधात भादंवि कलम 143, 147, 149, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तर विकास खाडये यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये फटाक्यांच्या कचऱयावरून झालेल्या शाब्दीक वादातून विलास खाड्ये व त्याचे मुलगे वासुदेव व महेंद्र अशा तिघांनी काठीच्या सहाय्याने मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या भाऊ रघुनाथ व मुलगा विक्रांत तसेच विक्रांत याचे सासरे राजेंद्र मानकर यांनाही मारहाण केल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार पोलीसांनी विलास खाडये, वासुदेव खाडये, महेंद्र खाडये व प्रमिला खाडये यांच्या विरोधात भादंवि कलम 323, 324, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस ठाण्याचे हवालदार कमलाकर पाटील करत आहेत.