देवाचा डोंगर येथून तालुक्यात पहिल्या टँकरची मागणी

 

मंडणगड l प्रतिनिधी : टँकरमुक्त तालुक्याच्या घोषणे करिता केंद्र व राज्य शासनाच्या विविध पाणी पुरवठ्याच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र एप्रिल महिन्याच्या पहील्या आठवड्यात देवांचा डोंगर येथे पाणी टंचाईमुळे टँकरने पाणी पुरवठा कऱण्याची मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर कुडुकखुर्द गुजरकोंड, बुरी, अडखळवण, वाल्किकीनगर, सोवेली बौध्दवाडी, मंडणगड शहराचा बरचसा भाग येथून दरवर्षी एप्रिल, मे मध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो. यंदा अद्याप या नेहमीच्या गावातून मागणी झालेली नसली तरी पहील्या आठवड्यानंतर नियोजनात नसलेल्या ठिकाणीही उद्भवात पाणी साठे नसल्याने टँकरच्या पाणी पुरवठ्याच्या मागणीची पुर्ण शक्यता आहे. त्याच त्याच गावांना विविध शासकीय पाणी पुरवठ्याच्या योजनांचा दुबार तिबार लाभ देऊन जिल्ह्यात सर्वात कमी पाणी टंचाई असलेला तालुका असा लौकीक मिळवून यंत्रणेने आपली पाठ नेहमीच थोपटून घेत तीन गावात सहा वाड्यात पाणी टंचाई निर्माण होते असे चित्र अगदी आश्वासक पध्दतीने निर्माण केले गेले आहे. टँकरमुक्तीच्या पलीकडे जावून टंचाईचे काळात डोक्यावरील हंडा व त्याकरिता माता भगिनींना कराव्या लागणाऱ्या शारिरीक श्रमांपासून तालुक्याची मुक्तीची सर्वांना आजही प्रतिक्षा आहे.

दरवर्षी पाणी टंचाईचे नियोजन पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात येते, नियोजन करुनही अनेक गावातील समस्या आराखड्यापर्यंत पोहचू शकलेल्या नाहीत. पाणी टंचाईचे समस्येकरिता केवळ कागदावरच प्रयत्न झाले असेही नाही. वाढती लोकसंख्या व उद्भवातील जलसाठ्यांचा विचार न करता केलेले नियोजन यामुळे योजना विफल झाल्या आहेत का असा प्रश्न आहे.