मंडणगड l प्रतिनिधी : मार्च महिन्यात वाढत जाणाऱ्या उन्हाच्या लाहीने एप्रिल व मे महिन्यातील संभाव्य उन्हाळ्याची प्रचिती तालुक्यास आली आहे. वातारणात सातत्याने होणारे बदल व जागतीक तापमान वाढीचे दृष्य परिणाम पर्यावरण प्रेमी मंडणगड तालुक्यासही आता भोगावे लागत आहेत. दापोली तालुक्याच्या अगदी जवळ असलेल्या व साधारण तसेच वातारवरण असलेला असा तालुका, हा लौकीक मंडणगड तालुक्याने मिळवीला होता. पण गेल्या दहा वर्षात तालुक्यात जमीन विकसीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड झाल्याने मंडणगड तालुका आपली ओळख नक्कीच गमावून बसला आहे.
दोन्ही तालुक्याचे तापमानात चार ते पाच अंशाचा फरक जाणवतो. आजही दापोलीपेक्षा जास्तीचे तापमान मंडणगडमध्ये नोंद होत आहे. डोंगराळ संरचना व पर्यावरणाने भरभरुन दिल्याने वन्यजीवसृष्टीने हा तालुका नटलेला आहे. उन्हाळ्यात आल्हादायक वातवरण व कधीही तेहतीस अंशाचे पुढे तापमान न जाणाऱ्या मंडणगड तालुक्यात गत चार पाच वर्षांपासून तापमानाचे नवनवीन उच्चांक गाठले जात आहेत. यंदा याची चूणुक मार्च महिन्यातच आली आहे. चाळीशीच्या पुढच्या गटातील नागरीकांना सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत काम करणे अशक्य होत आहे. एप्रिल व मे महिन्यात उष्म्याचे प्रमाण आणखीनच वाढणार असल्याने वयोवृध्द व मध्यमवयीन नागरीकांच्या अडचणी आणखीनच वाढणार आहेत. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने गावागावात पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्रतेने जाणवू लागली.
उन्हापासून संरक्षण करीत व पाणी व जलयुक्त आहारावर भर देवून उन्हापासून वाचवण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. नागरीकांना चक्कर अथवा भोवळे येण्याच्या घटना दररोज घटत असल्याने उन्हापासून वाचून काम कऱणे गरजेचे असल्याचे आरोग्य विषयक जाणकरांचे मत आहे. पर्यावरणातील बदल नाईलाजाने स्विकारावे लागणार आहेत यास जास्तीच्या मानवी महत्वकांक्षा कारणीभूत आहेत. विकासाकरिता येथील वनांवर झालेले अतिक्रमण लक्षणीय आहे ते थांबावे या करिता कोणतेही काम होत नसल्याने आजची परिस्थिती ओढावलेली आहे. व भविष्य काळत समस्येची तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता आहे.











