देवरुख | प्रतिनिधी : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, महिला विकास कक्ष व आजीवन अध्ययन कक्ष या विभागांच्या संयुक्त विद्यमाने जन शिक्षण संस्थान, रत्नागिरी यांच्या साहाय्याने कौशल्य विकास कार्यक्रमातर्गत विद्यार्थिनींना ज्युट व हस्तकला उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन जन शिक्षण संस्थेच्या जिल्हा कार्यक्रमाधिकारी निधी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमात निधी सावंत यांनी मार्गदर्शन करताना जन शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. जन शिक्षण संस्था ही योजना भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातर्फे राबविण्यात येत असून, माजी केंद्रीय मंत्री मा. सुरेशजी प्रभू यांनी स्थापन केलेली व मा. उमा प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेली संस्था आहे. मानव साधन विकास संस्था, मुंबई यांनी ही योजना २०२१-२२ पासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लोकांना आवश्यक असणाऱ्या व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षणांचे आयोजन गाव स्तरावर केले जाते. दक्षता, स्वावलंबन आणि सन्मान या त्रिसूत्रीचा अवलंब करून ग्रामीण जनतेच्या उपजीविकेला व पर्यायाने ग्रामीण विकासाला चालना देण्याचे काम या योजनेतून होत आहे. याबरोबरच साक्षरता, पर्यावरण, आरोग्य, महिला प्रबोधन अशा विविध विषयांवरही जनजागृती केली जात आहे .१५ ते ४५ वयोगटातील व्यक्तीना असिस्टंट ड्रेस मेकर, ब्युटी केअर मदतनीस , फळ व भाज्या प्रक्रिया , भरतकाम मदतनीस, ज्युट- हस्तकला उत्पादन निर्मिती, टू व थ्री व्हीलर मेकॅनिक हेल्पर, सहाय्यक संगणक ऑपरेटर , इलेक्ट्रिकल टेक्निकल हेल्पर, प्लंबर व वेल्डिंग असिस्टंट अशा प्रकारचे विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून सहभागीना त्यांच्या उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था प्रयत्न करते.
या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहनांची दुरुस्ती तसेच कोकणातील विविध फळांवरील प्रक्रिया करणारे प्रशिक्षण या संस्थेकडून दिले जावे अशी इच्छा व्यक्त केली. कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यक्षा ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी अशा प्रकारच्या प्रशिक्षणांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन विद्यार्थिनींनी कौशल्य पारंगत होऊन व्यावसायिक दृष्टीने स्वावलंबी व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजीवन अध्ययन कक्षाच्या प्रमुख प्रा. स्नेहलता पुजारी यांनी केले . त्यांनी महाविद्यालयामार्फत चालवण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकासाच्या संधींची विद्यार्थिनींना ओळख करून दिली. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. वर्षा फाटक यांनी केले. या प्रशिक्षण वर्गाच्या आयोजनासाठी संस्था उपाध्यक्षा नेहा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये , महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. सानिका भालेकर, प्रा. देवयानी जोशी, प्रा. स्वप्नाली झेपले विशेष प्रयत्न करत आहेत. या प्रशिक्षणांतर्गत वीस विद्यार्थिनी जूट व हस्तकला उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण घेत आहेत.
महाविद्यालयात विविध कौशल्याधारीत प्रशिक्षण वर्ग निरंतर चालू रहाणार असून,
या प्रशिक्षण वर्गाचा फायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी करून घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले आहे. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, कुमार भोसले, शिरीष फाटक, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.