रत्नागिरी : गोळप कट्टाच्या ४१ व्या कार्यक्रमात रत्नागिरी येथील अष्टपैलू कलाकार श्रीकांत ढालकर यांनी जीवनप्रवास उलगडला.
श्री. ढालकर म्हणाले की, आमचे मूळ गाव संगमेश्वर तालुक्यातील कुटरे. वडील शिक्षक होते ती नोकरी सोडावी लागली. गावातील त्यांच्या वाट्याची सर्व जमीन चुलत कुटुंबात देऊन रत्नागिरीला आले. आई सुद्धा पूर्वी शिक्षिका होती. लग्नानंतर गृहिणी व वडिलांची खासगी नोकरी बापुराव पटवर्धन यांच्या दुकानात लेखा जोखा काम करायचे. त्यांना नाटकाची आणि चित्रकला आवड होती. अनेक नाटकातून स्त्री भूमिकाही वठवली. त्यांच्यामधील गुण माझ्यात आले. लहानपणी शाळेत एक शिल्पकार विनायक करमरकर यांच्यावर धडा होता. मूर्तिकार होण्यास प्रथमतः त्या धड्यातून प्रेरणा घेतली. गणपती मूर्ती जमेल तशी बनवू लागलो. प्रसिद्ध मूर्तिकार कृष्णा कांबळे यांच्याकडे तासनतास बसुन निरीक्षण करू लागलो. नंतर स्वतः प्रयत्न केले. त्यात कमीजास्तपणा ते सांगत असत. शिकत शिकत मूर्ती घडवू लागलो. १९८२ ला पहिली गणपती मूर्तीची ऑर्डर मिळाली. गणपती किंवा कोणत्याही मूर्तीसाठी रेखणी महत्त्वाची असते. ती पण निरिक्षणातून शिकलो. त्यावर हात बसला.
ढालकर म्हणाले की, वडिलांना व्यायाम आवड होती. त्यांचे बरोबर व्यायाम करत असे. शाळेत असताना ५०० सूर्यनमस्कार तसेच ३०० जोर मारण्याच्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. दहावी झाल्यावर जे. जे. आर्ट स्कूलला जायच होते. मात्र तेवढी परिस्थिती नसल्याने वडिलांनी बघून चित्र काढायला शिक आणि परीक्षा दे सांगितले. ते अंमलात आणले. प्रचंड चिकाटीने करत होतो. चित्रकलेत जम बसला. कॉलेजला आकृत्या, चित्रे काढण्यासाठी संधी मिळाली. छत्र्यांवर नावे घालणे, भिंतीवर चित्र काढणे अशी असंख्य कामे केली. पाटबंधारे ऑफिसला अनुरेखकाचे काम मिळाले होते. तिथे चित्रकला आणि गणपती मूर्ती कलेच्या जोरावर कंत्राटी कामगार म्हणुन संधी मिळाली. पुढे शून्य बजेट मध्ये नोकरी गेली होती, उपोषण केले. मग केस चालली. तिथे बाजू पटवून दिल्याने मला परत नोकरी मिळाली. त्यानंतर पुन्हा अतिरिक्त ठरल्याने मला महसूलमध्ये तलाठी म्हणुन जव्हार, ठाणे जिल्ह्यात नोकरी दिली. तिथे प्रांत ऑफिसमध्ये काम केले. तेथेही कलेच्या जोरावर स्थान निर्माण केले. खात्यांच्या स्पर्धात कोकणाला अनेक स्पर्धात कायम पहिला नंबर मिळवून दिला.
पुढे धामणसे येथे बदली मिळाली. २०१५ ला स्वेच्छानिवृत्ती घेतली. लहानपणी रामदास पाध्ये यांचा दूरदर्शनवर कार्यक्रम पहायचो. तो पाहून छंद जडला. आरसा गुरू मानून प्रचंड मेहनत आणि सराव केला. त्यात शब्दभ्रमकलेत यशस्वी झालो. लांजा येथे राजेंद्र कोकाटे या मित्राने पक्षी निरीक्षण आवड लावली. खूप मार्गदर्शन त्यांनी केले. प्रचंड निरीक्षण, अभ्यास केला, चित्रे काढली, आवाज हुबेहुब जमायला लागले. नेहमी स्वतःशी स्पर्धा केली आणि प्रगती केली. एस व्यासा बंगलोर येथे योग शिक्षक शिक्षण घेतले. तिथे शिक्षण सुद्धा दिले. पतंजली योग शिक्षक झालो. योग मार्गदर्शन करतो. अनेक शाळांतून मुलाना चित्रकला मार्गदर्शन मोफत केले. प्रात्यक्षिकांसह असंख्य कार्यक्रम केले.
श्रीकांतजी म्हणाले की, शिरीष पै यांचे हायकू पुस्तक वाचल्यावर त्या प्रकारच्या तीन ओळींच्या कविता केल्या. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. संगीत नाटकात कामे केली. विशेष म्हणजे पाऊले चालती पंढरीची वाट या नाटकात ५१ प्रयोगात प्रत्यक्ष रंगमंचावर प्रेक्षकांसमोर नाचत दिड ते दोन फूट विठ्ठलाची हाती मूर्ती घडविल्या व रंगविल्या. केवळ नव्वद मिनिटात. अध्यात्माचा अभ्यास केला. त्यातून चिंतनाने दिशा मिळाली. अभ्यास झाला, प्रवचने केली. अनेक कीर्तने केली. आजपर्यंत अनेक मोठ्या व्यक्तींच्या हस्ते सत्कार झाला. खूप पुरस्कार मिळाले. स्वतःशी स्पर्धा केली आणि प्रत्येक गोष्टीचा ध्यास घेतला तर आपण त्यात यशस्वी होऊ शकतो. कुणाला तरी प्रेरणा मिळेल या उद्देशाने या स्तुत्य उपक्रमाला आलो.
ढालकर यांनी यावेळी अनेक पक्ष्यांचे हुबेहुब आवाज काढले. तोंड बंद ठेवून, ब्रश करताना, हसताना अविश्वसनीय गाणी म्हणुन दाखवली, फणी वर अप्रतिम गाणी वाजवली, बोलक्या बाहुल्याचा मंत्रमुग्ध करणारा खेळ दाखवला.