कोलवाळ पोलिसांची कारवाई
बांदा : प्रवीण परब
माडेल – थिवीम येथून एकाचे अपहरण करून नंतर मारहाण करून लुबाडणाऱ्या राजस्थान येथील तिघा संशयिताना कोलवाळ (गोवा) पोलिसांनी सावंतवाडी येथून ताब्यात घेतले. बलवीर सिंग गुर्जर (३३), राजकुमार चौधरी (३३, दोघेही रा. राजस्थान) व वीरेंद्र सुमार (५६, रा. पश्चिम दिल्ली) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी रात्री सावंवाडीत ही कारवाई करण्यात आली असून गुन्ह्यासाठी वापरलेली गाडीही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कोलवाळ पोलीस निरीक्षक विजय राणे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हितेश जांगीड (रा. कल्याणपूर राजस्थान) यांचे रविवार २८ एप्रिल रोजी थिवीम येथून तिघा अज्ञातानी अपहरण केले होते. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईल, सोन्याची अंगठी व रोख ५ हजार लुटून संशयित फरार झाले होते. सोमवारी याबाबत कोलवाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपासणी पथक नियुक्त करण्यात आले.
या पथकाने केलेल्या तपासणी दरम्यान तिघेही संशयित सावंतवाडीत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार कोलवाळ पोलिसांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची भेट घेतली. सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ते तिघेही संशयित सावंतवाडीतून पळून जाण्याच्या बेतात असताना सोमवारी रात्री कोलवाळ पोलिसांनी त्यांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अधिक तपास कोलवाळ पोलीस करीत आहेत.










