रत्नागिरी | प्रतिनिधी : जागतिक आरोग्य दिनानिमित्त दि.७ ते १४ एप्रिल या कालावधीमध्ये “सुंदर माझा दवाखाना” स्वच्छता अभियान जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे. या अभियानात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सहभागी होणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वयंसेवक, सामाजिक संस्थांनीही यामध्ये सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे, व संस्था बळकटीकरणास मदत करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कीर्तीकिरण पूजार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठल्ये यांचेकडून करण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य दिन दि.७ एप्रिल २०२३ साठीचे घोषवाक्य Health Equity, Health for all (सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा, सर्वांसाठी आरोग्य) असून जगभरात समान आरोग्य सेवा – सुविधांबद्दल जागरुकता पसरविणे, आरोग्याशी संबंधित गैरसमज दूर करणे हे उद्दिष्ट आहे.
यासोबतच विविध आरोग्यविषयक धोरणे तयार करण्यास आणि त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यास प्रवृत्त केले जाते. सरकारी रुग्णालये आणि आरोग्य संस्थेत सर्वांना समान सुविधा उपलब्ध आहेत. लोकांनी सार्वजनिक रुग्णालयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त “सुंदर माझा दवाखाना” हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे.
सध्या आरोग्य संस्थांमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वच्छता दिवस पाळला जातो. सदरचा दिवस नियमित राबविण्यात येणार असून, आरोग्य संस्थांच्या भोवतालचा परिसर, सर्व विभाग, स्वच्छतागृहे, भांडारगृहे इत्यादींची स्वच्छता करण्यात यावी, तसेच आरोग्य संस्थांच्या आवारात व दर्शनी भागात सुशोभीकरण करण्याबाबत कळविणेत आले आहे. स्वच्छता दिनाचा कार्यक्रम जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.