कोदवली धरण भरले, राजापूरकरांना उद्या पासून नियमित ४५ मिनिटे पाणीपुरवठा सुरू- प्रशांत भोसले

राजापूर l प्रतिनिधी : यापुर्वी झालेल्या मान्सूनपुर्व व त्यानंतर सक्रिय झालेल्या मान्सूनने राजापूरकरांना दिलासा दिला आहे. शहराला नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाचे धरण भरून वाहू लागल्याने आता शहरात बुधवार पासून नियमित पुर्वीप्रमाणे ४५ मिनिटे पाणीपुरठा सुरू करण्यात आला आहे. तशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली आहे.

राजापूर शहरात दरवर्षी मार्च पासूनच पाणीटंचाई निर्माण होते. शहराला नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाचे धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर केवळ शिळ जॅकवेलवरच शहराचा पाणीपुरवठा अवलबून असतो. मात्र तो पाणीपुरवठा शहरातील नळधारकांना पुरविताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होते. त्यामुळे मग उपलब्ध पाणीसाठयातुन शहर वासीयांना पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीपुरवठा करता यावा यासाठी नगर परिषदेकडून एक दिवसाआड वा दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो.

यावर्षीही मार्च मध्येच कोदवली धरणात खडखडाट झाल्याने शहरवासीयांना मार्च पासूनच पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागला. मार्च मध्येच शहरात एक दिवसाआड व त्यानंतर दोन दिवसाआड पाणीपुरवठयाचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.

मात्र यावर्षी पावसाने लवकर हजेरी लावल्याने शहरवासीयांची पाणीटंचाईच्या संकटातुन मुक्त्तता झाली आहे. आठवडा भरापुर्वी झालेल्या मान्सूनपुर्व पावसामुळे शहराला नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाचे धरणात पाणीसाठा निर्माण झाल्याने प्रशासनाकडून दोन दिवसाआड ऐवजी एक दिवसाआड पाणी सोडण्यात आले होते. आता मान्सून सक्रीय झाल्याने व गेल्या तीन ते चार दिवसात तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने कोदवली धरणात मुबलक पाणीसाठा होऊन धरण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे शहरवासीयांना आता पुर्वीप्रमाणे नियमित ४५ मिनिटे पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी भोसले यांनी दिली आहे. टंचाई काळात राजापूर शहरातील नागरिकांनी प्रशासनाला केलेल्या बहुमोल अशा सहकार्याबद्दल भोसले यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.