कोकणात महायुतीचे वर्चस्व त्यामुळे विजयाची खात्री : निरंजन डावखरे

रत्नागिरी : प्रतिनिधी कोकणामध्ये महायुतीचे वर्चस्व आहे. तर मागील बारा वर्षात आपण अनेक कामे कोकण पदवीधर मतदार संघात केलेली आहेत. त्यामुळे समोर कोणीही असला तरीही आपल्याला विजयाची खात्री असल्याचे प्रतिपादन भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी रत्नागिरीत केले.

महायुतीच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी भाजपाच्या वरिष्ठांनी पुन्हा संधी दिल्याबद्दल सर्वच पदाधिकार्‍यांचे आभार मानले. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क या मतदार संघात आहे. पाच जिल्ह्यांचा हा मतदार संघ आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर व ठाणे या जिल्ह्यांचा आहे. सर्वच जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे जाळे असल्याने, याठिकाणी आपल्याला निश्चित त्याचा फायदा होणार आहे.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार आपण मानले आहेत. अभिजीत पानसे, अविनाश जाधव यांनी पूर्ण ताकदीने आपल्या पाठिशी राहिले आहेत.

पाचही जिल्ह्यात महायुतीचे खासदार निवडून आले आहेत. विशेषत: भाजपाचे नेते रविंद्र चव्हाण, खा. नारायण राणे, मंत्री उदय सामंत, खा. सुनील तटकरे, खा. किसन कथोरे, आमदार नितेश राणे यांच्यासह महायुतीची मोठी ताकद पाच जिल्ह्यात आहे. त्यामुळे निश्चित महायुतीचा विजय होईल असा विश्वास डावखरे यांनी व्यक्त केला. एमपीएससी विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे विषय, ग्रंथपाल, ग्रंथालय, शालेय संस्था यांचे विषय निश्चितपणे आपण सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सर्वच आपल्या पाठिशी असल्याचा दावाही निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला.